नागपुरात रस्त्यावर कपडे धुवून केली इस्त्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 09:58 AM2018-12-18T09:58:49+5:302018-12-18T10:00:51+5:30
आंदोलनाचे केंद्रस्थळ झालेल्या संविधान चौकात सोमवारी अनोख्या आंदोलनाने सर्वांचे लक्ष वेधले. येथे काही आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावरच कपडे धुतले व कपड्यांना इस्त्रीही केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आंदोलनाचे केंद्रस्थळ झालेल्या संविधान चौकात सोमवारी अनोख्या आंदोलनाने सर्वांचे लक्ष वेधले. येथे काही आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावरच कपडे धुतले व कपड्यांना इस्त्रीही केली. ये-जा करण्यासाठी आश्चर्यकारक वाटणारे हे आंदोलन महाराष्ट्र धोबी (परीट) समाज आरक्षण समन्वय समितीच्यावतीने करण्यात आले. वर्षानुवर्षे पारंपरिक कपडे धुण्याचा व्यवसाय करून उदरनिर्वाह करणाऱ्या या समाजातर्फे न्याय हक्काच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी हे प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले.
परीट समाजाच्या आरक्षणाबाबत डॉ. डी.एम. भांडे समितीचा अहवाल राज्याच्या शिफारशींसह केंद्र शासनाला पाठविण्याच्या मुख्य मागणीसाठी सोमवारी राज्यभरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले. समन्वय समितीच्या सदस्या उज्ज्वला कामरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्राच्या स्थापनेच्या आधी परीट समाज अनुसूचित जाती (एससी)च्या वर्गवारीत समाविष्ट होता. मात्र राज्याच्या स्थापनेनंतर समाजाला एससीच्या वर्गवारीतून काढून ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करण्यात आले. त्यामुळे हा समाज सवलतीपासून वंचित राहिल्याने शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक प्रगतीपासूनही वंचित राहिलेला आहे. विशेष म्हणजे पारंपरिक व्यवसाय करणारा हा समाज देशभरात पसरला असून यातील १८ राज्यांमध्ये आजही एससीच्या वर्गवारीतच मोडला जातो. मग महाराष्ट्रातच हा अन्याय का, असा सवाल त्यांनी केला. ६१ वर्षे हक्कांसाठी आंदोलन केल्यानंतर राज्य शासनाने २००१ मध्ये डॉ. भांडे यांच्या अध्यक्षतेत ‘धोबी समाज पुनर्विलोकन समिती’ची स्थापना करण्यात आली. या समितीने धोबी समाज अस्पृश्यतेचा निकष पूर्ण करीत असून एससीमध्येच समाविष्ट करण्याचा अहवाल दिला होता. मात्र १६ वर्षे लोटूनही अहवाल लागू करण्यात आला नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे आज राज्यभरात आंदोलन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय संत गाडगेबाबा यांना भारतरत्न मिळावा, श्रीक्षेत्र ऋणमोचन येथे संत गाडगेबाबा यांचे स्मारक उभारण्यात यावे, गाडगेबाबा यांची जयंती स्वच्छता दिन म्हणून पाळण्यात यावी आदी मागण्या करण्यात आल्या. आंदोलनानंतर डी.डी. सोनटक्के, रामभाऊ डोंगरे, सुरेश भोस्कर, माणिकराव भोस्कर, अशोक क्षीरसागर, नंदा क्षीरसागर यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने जिल्हाधिकाºयांना निवेदन सादर केले.