नागपुरात आभाळ फाटले! उमरेडमध्ये एक वाहून गेला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2019 11:04 PM2019-09-06T23:04:31+5:302019-09-06T23:08:14+5:30
शुक्रवारी नागपूर जिल्ह्यात आभाळ फाटल्यासारखी स्थिती निर्माण झाली होती. सलग सहा तास झालेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले. उमरेड व कुही तालुक्याच्या सीमावर्ती गावातील शेतकरी नाल्याच्या पुरात वाहून गेल्याची घटना उघडकीस आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शुक्रवारी नागपूर जिल्ह्यात आभाळ फाटल्यासारखी स्थिती निर्माण झाली होती. सलग सहा तास झालेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, सकाळी ८ ते रात्री ८ वाजतापर्यंत दिवसभरात ७७.२ मि.मी. पावसाची नोंद नागपूर वेधशाळेने केली आहे. उमरेड व कुही तालुक्याच्या सीमावर्ती गावातील शेतकरी नाल्याच्या पुरात वाहून गेल्याची घटना उघडकीस आली आहे.
शुक्रवारी सकाळी ११ ते संध्याकाळी ५ वाजतापर्यंत संपूर्ण नागपूर जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला. संपूर्ण शहरात पूरजन्य स्थिती निर्माण झाली होती. मेडिकलमध्ये अनेक वॉर्डात पाणी शिरल्याने, रुग्णांना गैरसोय सहन करावी लागली.
शाळांना सुटी
शुक्रवारी झालेला जोराचा पाऊस आणि पुढचे दोन दिवस वेधशाळेकडून प्राप्त झालेला अति ते अतिवृष्टीच्या इशाºयाने दक्षता म्हणून शहरातील शाळा व्यवस्थापकांनी शनिवारी शाळांना सुटी जाहीर केली आहे.
पुढचे तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा
नागपूर वेधशाळेने पुढचे तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा देणारे ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केले आहे. या अलर्टमध्ये २४ तासात साधारणत: ६५ ते १२५ मि.मी. पावसाची नोंद होते. विशेष म्हणजे, पावसाच्या तीव्रतेकडे सातत्याने लक्ष दिले जात असून, शुक्रवार-शनिवारच्या मध्यरात्री पावसाचा अंदाज व्यक्त करून, हा इशारा अति ते अतिवृष्टी दर्शवणारा ‘रेड अलर्ट’मध्ये रूपांतरित केले जाण्याची शक्यता बळावली आहे. पश्चिम बंगालच्या सागरातील वायूबदलामुळे ओडिशा क्षेत्रावर निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा छत्तीसगडकडे सरकला असल्याने, अति ते अतिवृष्टीच्या शक्यतेला अधिक बळ मिळाल्याचे, वेधशाळेकडे स्पष्ट करण्यात आले आहे.