सूर्याला ढगांची सलामी, तापमानाला लागला ब्रेक! २४ तासांत पारा ५.६ डिग्री सेल्सियसने खाली
By नरेश डोंगरे | Published: March 2, 2024 10:15 PM2024-03-02T22:15:48+5:302024-03-02T22:16:07+5:30
हलका पाऊस, वातावरण बनले सुसह्य
नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: डोळे दाखविणाऱ्या सूर्याला ढगाळ वातावरणाने सलामी दिल्यामुळे वाढत्या तापमानाला ब्रेक लागला आहे. त्यामुळे गेल्या २४ तासांत पारा ५.६ डिग्री सेल्सियसने खाली उतरला आहे. शनिवारी सकाळपासून ढगाळ वातावरण असल्यामुळे आज दिवसाचे तापमान ३१.६ डिग्री सेल्सियस होते. दुपारी ४ वाजता हलके उन पडले तर काही ठिकाणी सायंकाळी हलका पाऊस आल्याने वातावरण काहीसे सुखद झाले होते.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार हवेच्या वेगामुळे आकाशात ढगाळ वातावरणाची निर्मिती झाली. परिणामी विदर्भातील काही भागात त्याचा परिणाम बघायला मिळाला. सकाळी हवेचा जोर तीव्र होता. सायंकाळी हवेची गती प्रति तास ७.४ किलोमिटर होती. ढगाळ वातावरणामुळे सकाळी आद्रता ५१ टक्के होती. सायंकाळी ती ४६ टक्क्यांवर पोहचली.
मार्चच्या पहिल्याच आठवड्यात पारा ४० ला पार करण्याच्या तयारीत दिसत आहे. विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यात शनिवारी कमाल तापमाण ३९.५ डिग्री सेल्सियसवर गेले होते. चंद्रपूर ३७.२ तर वाशिम ३७ डिग्रीवर होते.
रविवारी हलक्या पावसाचा अंदाज
नागपुरात रविवारीदेखिल ढगाळ वातावरणाचा अंदाज असून हवेचा वेग जास्त राहिल. त्यामुळे हलका पाऊस येण्याची शक्यता आहे. मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात तापमान तीव्र होईल. पारा ४० ते ४२ डिग्रीच्या जवळ पोहचू शकतो. गेल्या एका दशकात ३१ मार्च २०१७ आणि २०१९ ला कमाल तापमान ४३.३ डिग्री नोंदविण्यात आले होते. तर, ४ मार्च १८९२ ला नागपूरचे कमाल तापमान ४५ डिग्री सेल्सियस नोंदविण्यात आले आहे. हा दिवस आतापर्यंतचा मार्च महिन्यातील सर्वात गरम दिवस राहिला आहे.