विदर्भात ढगाळी-पावसाळी पुन्हा दोन दिवस; दिवसाचा पारा ८ अंशाने चढला, २४ तासात कडाका घटला
By निशांत वानखेडे | Published: November 29, 2023 07:23 PM2023-11-29T19:23:13+5:302023-11-29T19:23:28+5:30
मंगळवारी अवकाळी पावसाच्या जोरदार हजेरीनंतर बुधवारी उघडीप मिळाली पण ढगाळ वातावरण कायम हाेते.
नागपूर: मंगळवारी अवकाळी पावसाच्या जोरदार हजेरीनंतर बुधवारी उघडीप मिळाली पण ढगाळ वातावरण कायम हाेते. पुढचे दाेन दिवस म्हणजे १ डिसेंबरपर्यंत विदर्भातरन अकराही जिल्ह्यात ढगाळ वातावरण आणि मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
मंगळवारी राज्यासह विदर्भातील सर्व जिल्ह्यात अवकाळी पावसाने जाेराचा तडाखा दिला. त्यामुळे खरीपाच्या कापणीला आलेला धान, साेयबीन, कापूस, मिरची, संत्रा बहार या पिकांना माेठा फटका बसला असून शेतीचे नुकसान झाले. पावसाचा जाेर रात्रीही कायम हाेता. बुधवार सकाळपर्यंत वर्ध्यात ४० मि.मी., गाेंदियात २२.४, ब्रम्हपुरी २३.६, नागपूर १३ मि.मी., अकाेला २०.१ व अमरावती १०.६ मि.मी. पावसाची नाेंद झाली. पावसाळी वातावरणामुळे दिवसाचे कमाल तापमान ११ अंशाने खाली घसरले हाेते. त्यामुळे नागरिकांना चांगलेच गारठवले आणि कपाटातील स्वेटर बाहेर आले.
दरम्यान बुधवारी पावसाळी वातावरण काहीसे निवळले. दिवसभर ढगाळ वातावरण हाेते पण पावसाची हजेरी लागली नाही. त्यामुळे नागपुरात ११ अंशाने घसरलेले तापमान २४ तासात ८.२ अंशाने वधारले. सध्या पारा २७.२ अंशावर असून सरासरीपेक्षा ३.४ अंशाने कमी आहे. रात्रीच्या तापमानाही १.५ अंशाची वाढ हाेत १७.७ अंशावर पाेहचले, जे सरासरीच्या ३.१ अंशाने अधिक आहे. ढगाळ वातावरणाचा गारठा जाणवण्याची शक्यता आहे.
२ डिसेंबरपासून वातावरण निवळेल व आकाश निरभ्र हाेईल. मात्र यानंतर रात्रीचा पारा सरासरीच्या खाली घसरण्याची व गारठा वाढण्याची शक्यता आहे. दिवसाचे तापमानही सरासरीच्या खाली राहिल आणि दिवसाही गारव्याचा अनुभव मिळेल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.