ढगाळ वातावरण पण प्रतीक्षाच; नागपुरात ३५ टक्के कमी पाऊस; विदर्भाचा अनुशेष ४३ टक्क्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2023 09:43 PM2023-07-07T21:43:42+5:302023-07-07T21:44:16+5:30

Nagpur News जुलैचा पहिला आठवडा उलटून गेला. परंतु, मान्सूनच्या पावसाने जोर धरलेला नाही. परिणामी नागपुरातील पावसाचा बॅगलॉग ३५ टक्क्यांवर पोहोचला आहे.

Cloudy weather but wait; 35 percent less rain in Nagpur; Vidarbha's backlog at 43 percent | ढगाळ वातावरण पण प्रतीक्षाच; नागपुरात ३५ टक्के कमी पाऊस; विदर्भाचा अनुशेष ४३ टक्क्यांवर

ढगाळ वातावरण पण प्रतीक्षाच; नागपुरात ३५ टक्के कमी पाऊस; विदर्भाचा अनुशेष ४३ टक्क्यांवर

googlenewsNext

नागपूर : जुलैचा पहिला आठवडा उलटून गेला. परंतु, मान्सूनच्या पावसाने जोर धरलेला नाही. परिणामी नागपुरातील पावसाचा बॅगलॉग ३५ टक्क्यांवर पोहोचला आहे. विदर्भाचा विचार करता आतापर्यंत फक्त १३४.५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. ती सरासरीच्या तुलनेत ४३ टक्के कमी आहे. विदर्भात या कालावधीत सरासरी २३४.४ मि.मी. पाऊस पडतो. पावसाच्या वाढत्या बॅकलॉगमुळे शेतकऱ्यांना घाम फोडला आहे.

नागपुरात आठ दिवस उशिराने मान्सून पोहोचला. जूनच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस झाला होता. त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला. नागपूरमध्ये १ जून ते ७ जुलैपर्यंत १६०.२ मिमी पाऊस झाला आहे. तो सरासरीच्या तुलनेत ३५ टक्के कमी आहे. पेरण्या खोळंबल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. नागपुरात ४ जूनपासून मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. मात्र, तीन दिवस उलटल्यानंतरही मुसळधार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. पुन्हा ८ आणि ९ जुलैलाही नागपूरला अलर्ट दिला आहे. हवामान खात्याचा हा अंदाज खरा ठरतो का, हे पाहावे लागेल. दरम्यान, शुक्रवारी आकाशात ढगांची गर्दी होती. सायंकाळी जोराचा पाऊस होईल असे वाटत होते. मात्र, पाऊस ठराविक भागातच पडला. सकाळी ८:३० वाजेपर्यंत ५.२ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार राजस्थान, झारखंड, मध्य प्रदेश इत्यादी राज्यांमध्ये चक्रीवादळ तयार होत आहे. गेल्या २४ तासांत विदर्भातील काही भागांत चांगला पाऊस झाला आहे. मात्र, नागपूर परिसरात दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. सकाळी ८:३० वाजेपर्यंत विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात ८०.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. याशिवाय अमरावती ६०.६ मिमी, गोंदियामध्ये ५५.४, बुलढाण्यात ३५ यवतमाळमध्ये १३.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. याशिवाय इतर जिल्ह्यांत हलक्या पावसाचे वृत्त आहे.

अकोल्यातील परिस्थिती बिकट

विदर्भातील अकोला जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती दिसून येत आहे. येथे सरासरीपेक्षा ७२ टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे. तर चंद्रपूरमध्ये ५७ टक्के, अमरावतीमध्ये ५२, वर्धा ५३, गडचिरोली ४५, तर वाशिममध्ये ४३ टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे. विदर्भात सध्या भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात परिस्थिती समाधानकारक आहे. सरासरीपेक्षा अनुक्रमे ३ आणि १ टक्के कमी पाऊस झाला आहे.

.............

Web Title: Cloudy weather but wait; 35 percent less rain in Nagpur; Vidarbha's backlog at 43 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.