विदर्भात वातावरण ढगाळ, पाऊस-गारपिटीचीही शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2023 12:02 PM2023-11-27T12:02:33+5:302023-11-27T12:03:01+5:30
नागपुरात पावसाची रिमझिम, पारा घसरल्याने गारवा वाढला
नागपूर : काही वातावरणीय प्रणालींमुळे पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी पावसाने हजेरी लावली असताना नागपूर व आसपासच्या जिल्ह्यात ढगाळ वातावरण तयार झाले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार विदर्भातील काही जिल्ह्यात साेमवारपासून पावसाची तीव्रता वाढणार असून गारपिटीचीही शक्यता व्यक्त केली जात आहे.
हवामान अभ्यासक माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्राला थंडी देणाऱ्या उत्तर वायव्य भारतातील पश्चिमी झंझावात अरबी समुद्राकडे सरकला आहे. उंचावरून खाली जमिनीकडे झेपावणारे थंड व कोरडे वारे व दक्षिण भारतातून हवेच्या दाबाचा प्रभावाच्या आर्द्रतायुक्त वाऱ्याच्या मिलाफातून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. या प्रभावाने पूर्व-पश्चिम विदर्भातही ढगाळ वातावरण तयार झाले आहे. या प्रभावाने २७ ला विदर्भात तीव्र पावसासह गारपिटीची शक्यता आहे. २८ राेजी मात्र गारपिटीची शक्यता नाही पण पाऊस मात्र राहील, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान तापमान घसरत चालले आहे. नागपूरचे कमाल तापमान रविवारी पहिल्यांदा ३० अंशांच्या व सरासरीच्या खाली आले. त्यामुळे वातावरणात गारठा वाढल्याची जाणीव हाेत आहे. नागपूरसह गाेंदिया, भंडाऱ्यात दिवसाचा पारा घसरला आहे. नागपूरला रात्रीच्या तापमानातही २४ तासात १.३ अंशाची घसरण झाली. कमाल तापमान २९.८ तर गाेंदियात सर्वात कमी २९.६ अंशाची नाेंद झाली. किमान तापमान १६ अंशांवर आले आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार दाेन दिवस पावसाची शक्यता असून त्यानंतर ढग ओसरण्याची व आकाश निरभ्र हाेण्याची शक्यता आहे. त्यामुळे २९ नाेव्हेंबरपासून थंडीत वाढण्याचा अंदाज आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात कडाका वाढेल, अशी अपेक्षा आहे. मात्र सध्या पावसाची शक्यता नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.