लोकसभेसाठी भाजपाकडून ‘क्लस्टर’ प्रणाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2018 10:47 AM2018-12-08T10:47:13+5:302018-12-08T10:48:43+5:30
लोकसभेच्या सर्वच जागांवर भाजपाचे संघटन मजबूत व्हावे व नियोजनबद्ध तयारी करता यावी यासाठी पक्षातर्फे प्रत्येकी तीन ते चार लोकसभांचे ‘क्लस्टर्स’ तयार करण्यात आले आहेत.
योगेश पांडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे मतदान आटोपले असताना भाजपातर्फे महाराष्ट्रात मात्र लोकसभा निवडणुकांच्या तयारीवर भर देण्यात येत आहे. लोकसभेच्या सर्वच जागांवर भाजपाचे संघटन मजबूत व्हावे व नियोजनबद्ध तयारी करता यावी यासाठी पक्षातर्फे प्रत्येकी तीन ते चार लोकसभांचे ‘क्लस्टर्स’ तयार करण्यात आले आहेत. प्रत्येक ‘क्लस्टर्स’चा टप्प्याटप्प्याने आढावा घेण्यात येत असून यात केंद्रीय नेतृत्वाने सुचविलेल्या २३ मुद्द्यांच्या तयारीची चाचपणी करण्यात येत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
शिवसेनेशी युतीसंदर्भात भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र दुसरीकडे सर्व लोकसभा क्षेत्रात पक्षाला बळकटी मिळावी व युती न झाल्यास पक्षाची पूर्ण तयारी असली पाहिजे, यासाठी ‘क्लस्टर्स’ प्रणाली राबविण्यात येत आहे. प्रत्येक लोकसभा क्षेत्राच्या तयारीचा वेगवेगळा आढावा घेणे हे वेळखावू काम ठरणार आहे. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र असा विविध क्षेत्रनिहाय आढावा घेतला तर सूक्ष्म पातळीवर आढावा घेणे शक्य होत नाही. त्यामुळेच तीन ते चार लोकसभा क्षेत्र मिळून एक ‘क्लस्टर्स’ तयार करण्यात आले आहे. यात त्या ‘क्लस्टर्स’ अंतर्गत येणाऱ्या जागांवर पक्षाच्या ‘बूथप्रमुख’, ‘पेजप्रमुख’, ‘शक्तीकेंद्र’ या योजनांचा आढावा घेण्यात येत आहे. सोबतच विविध विभागांसह एकूण २३ मुद्द्यांवर नेमकी तयारी कशा पद्धतीने सुरू आहे, याचा सखोल आढावा घेण्यात येत आहे. विशेष म्हणजे केंद्रीय पातळीवरुनच हे २३ मुद्दे सांगण्यात आले आहेत. यात ‘सोशल मीडिया’, महिला मोर्चा, ‘लीगल सेल’ यासारख्या विविध बाबींचा समावेश आहे.
राज्य प्रभारी करत आहेत दौरा
केंद्रीय पातळीवरील सूचनांनुसार राज्य प्रभारी खा.सरोज पांडे या राज्यात ‘क्लस्टर’ निहाय आढावा घेत आहेत. दोन दिवसांअगोदर पुण्यात त्यांनी बैठक घेतली. त्यानंतर शुक्रवारी नागपुरात बैठक झाली. विविध पातळ्यांवर पक्षाची नेमकी किती तयारी झाली आहे, कुठल्या ठिकाणी पक्षाला आणखी मजबुतीची आवश्यकता आहे तसेच विविध मतदारसंघात कच्चे दुवे कोणते इत्यादींची त्या चाचपणी करत आहेत. याचा सविस्तर अहवाल तयार होणार असून त्याआधारे नवीन वर्षात पुढील दिशा ठरणार आहे, असे सूत्रांनी सांगितले. यासंदर्भात सरोज पांडे यांना विचारणा केली असता त्यांनी संघटनेचा आढावा घेण्यासाठीच बैठका होत असल्याचे सांगत सविस्तर माहिती देण्यास नकार दिला.
सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचविण्यावर भर
नागपुरात झालेल्या बैठकीला सरोज पांडे यांनी नागपूर, रामटेक व भंडारा या जागा मिळून करण्यात आलेल्या ‘क्लस्टर’चा आढावा घेतला. यावेळी या मतदारसंघांमधील खासदार, आमदार यांच्यासह भाजपाचे संघटनमंत्री विजय पुराणिक, विदर्भ संघटनमंत्री डॉ.उपेंद्र कोठेकर, नागपूर शहराध्यक्ष आ.सुधाकर कोहळे, हेदेखील उपस्थित होते. तीनही लोकसभा क्षेत्रात ‘बूथ’पातळीच्या मजबुतीवर भर देण्याची सूचना सरोज पांडे यांच्याकडून देण्यात आली. सोबतच केंद्र व राज्य सरकारच्या योजना व कामे विविध माध्यमाने जास्तीत जास्त प्रमाणात जनतेपर्यंत पोहोचविण्याचीदेखील सूचना करण्यात आली. ज्या पातळ््यांवर पक्ष मागे पडत आहे, त्याकडे विशेष लक्ष देण्यासदेखील त्यांनी सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली.