विदर्भात मत्स्यबीज उत्पादनासाठी क्लस्टर विकसित होणार; सुधीर मुनगंटीवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2022 11:37 AM2022-11-01T11:37:03+5:302022-11-01T11:39:49+5:30
‘माफसू’मध्ये जिल्हाधिकारी, सीईओ व तज्ज्ञांसोबत बैठक
नागपूर :विदर्भात रोजगार निर्मितीच्यादृष्टीने मत्सव्यवसायाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. मत्स्य व्यवसाय क्षेत्रातील सुधारणा आणि विकासासाठी विदर्भात मत्स्यबीज उत्पादनासाठी क्लस्टर म्हणून विकसित केला जाऊ शकतो. तेव्हा जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, ‘माफसू’ यांनी त्या पद्धतीने कामाची दिशा ठरवून आराखडे तयार करावेत व मत्सव्यवसायाकडे बघावे, अशी सूचना पशू व मत्स्य विद्यापीठ नागपूर येथे आयोजित बैठकीत राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली.
विदर्भातील मत्स्यव्यवसाय विकास आणि गोड्या पाण्यातील मत्स्यपालन या विषयाचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. यावेळी भंडारा-गोंदियाचे खासदार सुनील मेंढे, माफसुचे कुलगुरू डॉ. आशिष पातूरकर, पशुसंवर्धन आयुक्त एस. पी. सिंग, मत्स्यव्यवसाय आयुक्त शीतल उगले, यांच्यासह पूर्व विदर्भातील वर्धा वगळता नागपूर जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा, गोंदियाच्या जिल्हाधिकारी नयना गुंडे, भंडाराचे जिल्हाधिकारी विनयकुमार मून, गडचिरोली जिल्हाधिकारी संजय मिना, नागपूर जिल्हा परिषदेचे सीईओ योगेश कुंभेजकर, गोंदियाचे अनिल पाटील, गडचिरोलीचे कुमार आशीर्वाद, चंद्रपूरचे विवेक जान्सन उपस्थित होते.
येथील विपुल जलसंपत्तीमुळे राज्यांमध्ये अंतर्गत मत्स्य व्यवसाय विकसित करण्यास भरपूर वाव आहे. यासाठी भारतीय कृषी अनुसंधान परिषद - केंद्रीय गोडेपाणी मत्स्यसंवर्धन संस्था (आयसीएआर -सीआयएफए) चे एक प्रादेशिक केंद्र चंद्रपूर येथे स्थापन करण्याबाबतची मागणी केंद्र शासनाकडे करण्यात येत आहे. यासाठी भारतीय कृषी अनुसंधान परिषद व केंद्रीय गोडेपाणी, मत्स्यसंवर्धन संस्थेला विनंती करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
वन्यजीवांमधील आजाराचे संशोधन नागपूरमध्ये व्हावे
जगामध्ये मोठ्या प्रमाणात प्राण्यांपासून मनुष्यांमध्ये जाणारे आजार वाढत आहे. कोरोनासारख्या आजाराने त्याची दृश्य भयानकता जगाला दाखवली आहे. त्यामुळे वेळीच प्रतिबंध करण्यासाठी जागतिक दर्जाचे या संदर्भातील संशोधन नागपुरात व्हावे, अशा शुभेच्छा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे दिल्या.
गोरेवाडा येथील वन्यजीव संशोधन व प्रशिक्षण केंद्रात संशोधन प्रकल्पाचे उद्घाटन वनमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. ईशान्य भारतासह अन्य भागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील या संशोधन केंद्राचे उद्घाटन त्यांनी केले. वेळी भंडारा-गोंदियाचे खासदार सुनील मेंढे, माफसुचे कुलगुरू डॉ. आशिष पातूरकर उपस्थित होते.