मुख्यमंत्र्यांनी दिले नागपुरात स्कीन बँक साकारण्याचे निर्देश; उपचार घेत असलेल्या रुग्णांची केली पाहणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2025 21:05 IST2025-04-13T21:04:58+5:302025-04-13T21:05:37+5:30

गरज भासल्यास एअर ॲम्बुलन्सने रुग्णांना ऐरोली येथे हलवणार

CM Devendra Fadnavis met the injured in the massive blast at MPM Company in Umred | मुख्यमंत्र्यांनी दिले नागपुरात स्कीन बँक साकारण्याचे निर्देश; उपचार घेत असलेल्या रुग्णांची केली पाहणी

मुख्यमंत्र्यांनी दिले नागपुरात स्कीन बँक साकारण्याचे निर्देश; उपचार घेत असलेल्या रुग्णांची केली पाहणी

नागपूर : उमरेड येथील एमपीएम कंपनीमध्ये झालेल्या भीषण स्फोटातील जखमी कामगारांवर ओरियस इन्स्टीट्यूट ऑफ मेडीकल सॉयन्सेस येथे उपचार सुरू आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी प्रत्यक्ष भेट देवून या कामगारांच्या उपचाराबद्दल डॉक्टरांकडून माहिती घेतली. रुग्णांच्या उपचाराची माहिती घेतांना नागपूरमध्ये स्कीन बँकेची नितांत आवश्यकता असल्याचे मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांना नागपूर येथे अद्ययावत स्कीन बँक साकारण्याबाबत निर्देश दिले.

नागपूर येथे मोठ्या प्रमाणात शेजारील राज्यातूनही विविध घटनांमध्ये अतीगंभीर असलेल्या रुग्णांना स्कीनची आवश्यकता भासते. याबाबत त्यांनी डॉक्टरांकडून अधीक माहिती घेवून शासन स्तरावरील कार्यवाही जलद गतीने पूर्ण होईल असेही सांगितले.

उमरेड येथील एमपीएम कंपनीमध्ये झालेली घटना ही दुर्देवी आहे. ज्या कुटुंबांनी आपल्या घरातील सदस्य गमावले त्या कुटुंबासमवेत शासन खंबीरपणे उभे आहे. जे कामगार जखमी झाले आहेत त्यांच्या उपचारासाठी कोणतीही कमतरता पडणार नाही. वेळप्रसंगी आवश्यकता भासल्यास रुग्णांना एअर ॲम्बुलन्सने ऐरोली येथील बर्न हॉस्पीटलमध्ये हलवू या शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जखमी कामगारांच्या नातेवाईकांना धीर दिला.

यावेळी त्यांच्या समवेत जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, हॉस्पीटलचे क्रीटकल केअर प्रमुख डॉ. ए.एस. राजपूत, स्कीन सर्जन डॉ. एस. जहागीरदार, पोलीस अधीक्षक हर्ष पोतदार, माजी आमदार सुधीर पारवे आदी उपस्थित होते.

Web Title: CM Devendra Fadnavis met the injured in the massive blast at MPM Company in Umred

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.