मॅजिक! इकडचे कटआऊट तिकडे अन् तिकडचे इकडे
By शताली शेडमाके | Published: December 29, 2022 11:47 AM2022-12-29T11:47:19+5:302022-12-29T12:07:59+5:30
आपलाच नेता मोठा हे दाखविण्याची चढाओढ
नागपूर : नागपुरात गेल्या दोन आठवड्यांपासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. विविध मुद्द्यांवरून सत्ताधारी-विरोधकांमधील तू तू- मै मै,आरोप-प्रत्यारोपांनी राजकीय वातावरण चांगेलच तापले आहे. विधान भवनाच्या प्रवेशाद्वारासमोर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मोठे पोस्टर लावण्यात आले आहेत. या पोस्टर्सकडे पाहून विशेष काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर यातली खरी गंमत आहे ती या 'कटआऊट्स'च्या अदलाबदली व उंचीची.
विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात १९ डिसेंबरपासून सुरू झाले. यावेळी शहरभरात ठिकठिकाणी अनेक नेते, मंत्री, पक्षाचे पोस्टर फ्लेक्स लागले आहेत. प्रत्येकजण पोस्टर, बॅनर, फ्लेक्समधून आपल्या पक्षाचे, नेत्याचे स्वागत करतानाचे चित्र पहायला मिळाले.
विधान भवनासमोरील इमारतीजवळ मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे मोठे कटआऊट्स लावण्यात आले आहेत. काल २८ तारखेला मुखमंत्री शिंदे यांचा व त्या बाजुला उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा कटआऊट लागलेला होता. परंतु, आज २९ तारखेला या पोस्टर्सची अदलाबदली झालेली दिसून आली. यावेळी फडणवीस यांचा पोस्टर आधी व शिंदेंचा पोस्टर नंतर असा क्रमबदल दिसून आला. शिवाय उपमुख्यमंत्र्यांची 'उंची' कमी करत मुख्यमंत्र्यांच्या लेव्हलवर आणण्यात आली. हे पाहताना आपला नेता किती मोठा हा दाखविण्याचा प्रयत्न यातून करण्यात आल्याचे यातून दिसून येत आहे.
महाराष्ट्रात सत्ताबदल होऊन शिंदे-फडणवीस यांचे डबल इंजिन सरकार सत्तेवर आले. यानंतर या जोडीची, त्यांच्या कामकाजाची चर्चा सातत्याने होतच असते. परंतु, हे पाहताना शिंदे गट व भाजप कार्यकर्त्यांमध्ये कोण मोठं? आपलाच नेता मोठा, अशी चढाओढ तर सुरू नाहीये ना, असं काहीसं चित्र दिसून येत आहे. उद्या अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. आता या पोस्टर्सचे पुढे काय होते. बदललेला क्रम हा पूर्वस्थितीत दिसेल, तसाच राहील की आणखी काय होईल हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.