मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस संघस्थानी; हेडगेवार, गोळवलकर गुरुजींच्या समाधीस्थळाचे घेतले दर्शन
By योगेश पांडे | Published: December 29, 2022 12:40 PM2022-12-29T12:40:50+5:302022-12-29T12:47:16+5:30
मुख्यमंत्रीपदी आरूढ झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांची संघस्थानावरील ही पहिलीच भेट
नागपूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग येथील डॉ.हेडगेवार स्मृतिमंदिर परिसराला भेट दिली. यावेळी त्यांच्यासमवेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील होते. यावेळी शिंदे यांनी आद्य सरसंघचालक डॉ.केशव हेडगेवार व द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरूजी यांच्या समाधीस्थळाचे दर्शनदेखील घेतले. मुख्यमंत्री झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांची ही संघस्थानावरील पहिलीच भेट आहे.
सकाळी साडेदहाच्या सुमारास मुख्यमंत्री तेथे पोहोचले. यावेळी संघ पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. महानगर सहसंघचालक श्रीधर गाडगे यांनी त्यांना संघकार्य व सेवाप्रकल्पाची माहिती दिली. रेशीमबागेत आ.प्रसाद लाड, शहराध्यक्ष आ. प्रवीण दटके हेदेखील उपस्थित होते.
यापूर्वी २७ डिसेंबर रोजी भाजपचे सर्व आमदार स्मृतिभवन परिसरात आले होते. त्या दिवशी भाजप आमदारांसोबत शिंदे गटाचे आमदार ही येतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, त्या दिवशी फक्त भाजप आमदार संघ कार्यालयात आले होते. त्या दिवशीचे उपक्रम फक्त भाजप आमदारांसाठी होता.