राष्ट्रपती नागपुरात अन् मुख्यमंत्री मुंबईतच, राजकीय चर्चांना उधाण
By योगेश पांडे | Published: July 5, 2023 05:36 PM2023-07-05T17:36:34+5:302023-07-05T17:37:46+5:30
राष्ट्रपतींच्या दौऱ्यात मुख्यमंत्री अनुपस्थित
नागपूर : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या पहिल्या विदर्भ दौऱ्यातील दोन्ही महत्वाच्या कार्यक्रमांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित नसल्याने विविध राजकीय चर्चांना उधाण आले आहे. राज्यातील राजकीय भूकंप व त्यानंतर शिवसेनेच्या (बाळासाहेब ठाकरे) भूमिकेबाबत बैठक असल्याने मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रपतींच्या कार्यक्रमाकडे पाठ दाखविल्याची चर्चा आहे.
मुंबईत राजकारण तापले असताना राष्ट्रपतींचा विदर्भ दौरा आला. प्रोटोकॉलचे पालन करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे हे नागपूरला आले. राज्यपाल रमेश बैस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी सायंकाळी राष्ट्रपतींचे स्वागत केले . त्यानंतर ते राजभवनातदेखील गेले. ते नागपुरात थांबतील अशी अपेक्षा असताना ते अचानक रात्री साडेआठ वाजता मुंबईकडे रवाना झाले.
नियोजित कार्यक्रमानुसार बुधवारी गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ व भारतीय विद्या भवनच्या सांस्कृतिक केंद्राच्या लोकार्पण समारंभाला ते उपस्थित राहतील असाच अंदाज वर्तवला जात होता. बुधवारी सकाळपर्यंत ते नागपुरात येतील असा दावा त्यांच्या निकटवर्तीयांकडून करण्यात आला होता. परंतु प्रत्यक्षात मुख्यमंत्री नागपुरात पोहोचलेच नाही. देशाच्या पहिल्या नागरिक नागपुरात आणि राज्याचा गाडा हाकणारे मुख्यमंत्री मुंबईत असे चित्र होते. मुख्यमंत्री या कार्यक्रमाला नेमके का आले नाही ही बाब स्पष्ट होऊ शकली नाही. मात्र या संदर्भात राजकीय वर्तुळात विविध कयास वर्तविण्यात येत आहेत.