शिक्षक दिनी नागपूर जिल्ह्यातील २० शिक्षकांसोबत मुख्यमंत्र्यांचा संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2022 12:09 PM2022-09-06T12:09:53+5:302022-09-06T14:35:35+5:30
शैक्षणिक विकासात भरीव सहभाग नोंदविण्याचे शिक्षकांचे अभिवचन
नागपूर : सोमवारी शिक्षक दिनानिमित्तनागपूर जिल्ह्यातील २० शिक्षकांना थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी ऑनलाइन संवाद साधण्याची संधी मिळाली. जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उपसंचालक, शिक्षणाधिकारी यांच्या उपस्थितीत हा ऑनलाइन संवाद झाला. शैक्षणिक विकासात भरीव सहभाग नोंदविण्याचा अभिवचन यावेळी शिक्षकांनी मुख्यमंत्र्यांना दिले.
शिक्षक दिनाचे औचित्य साधत महाराष्ट्रातील शिक्षकांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट संवाद साधला. त्यांच्यासोबत राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर, शिक्षण विभागाचे सचिव रणजितसिंह देवोल, संचालक कैलास पगारे उपस्थित होते, तर नागपूरवरून शिक्षकांसोबत जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, शिक्षण उपसंचालक डॉ. वैशाली जामदार, शिक्षणाधिकारी रवींद्र काटोलकर उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांनी आपल्या संवादात त्यांच्या शाळकरी जीवनातील आठवणी सांगितल्या. महानगरपालिकेच्या २३ नंबरच्या शाळेत शिकल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. त्यांना शिकवणाऱ्या परब गुरुजींची आठवणही सांगितली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रात काही नावीन्यपूर्ण प्रयोग झाले. त्यातील चंद्रपूर जिल्ह्यातील ३६५ दिवसांची शाळा चालविणाऱ्या एका शिक्षकाचे तोंडभरून कौतुक केले. शिक्षकाच्या अशैक्षणिक कार्यापासून ते पगारांच्या तारखेपर्यंतच्या सगळ्या विषयांवर मुख्यमंत्री मोकळेपणाने बोलले.
नागपूर जिल्ह्यातील शिक्षकांनीही यावेळी आपल्या समस्या त्यांच्या समक्ष मांडल्या. नागपूर जिल्ह्यातून बोलण्याची संधी मिळालेले उमरेड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरी येथील शिक्षक एकनाथ पवार यांनी जिल्ह्यातील शैक्षणिक विकाससंदर्भात शासन जी कार्यप्रणाली तयार करेल, त्याची शंभर टक्के अंमलबजावणी नागपूरमध्ये केली जाईल, अशी ग्वाही दिली.