कर्जमाफीचा दुसरा टप्पा मुख्यमंत्री लगेच जाहीर करणार : बच्चू कडू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 08:17 PM2020-02-24T20:17:35+5:302020-02-24T20:19:07+5:30
राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा दुसरा टप्पा मुख्यमंत्री लगेच जाहीर करणार असल्याची माहिती जलसंपदा, लाभक्षेत्र तथा शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा दुसरा टप्पा मुख्यमंत्री लगेच जाहीर करणार असल्याची माहिती जलसंपदा, लाभक्षेत्र तथा शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली.
गोविंदराव वंजारी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने आयोजित विदर्भ छात्र संसद या उपक्रमासाठी आले असता पत्रकारांनी त्यांना गाठले. ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी दोन टप्प्यात कर्जमाफी जाहीर केली होती. त्यातील पहिला टप्पा दोन लाखांच्या आत कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी होता. वीस ते पंचवीस हजार शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. दोन लाखांवर कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा हा दुसरा टप्पा राहणार आहे. कर्जमाफी देताना गोंधळ होणार नाही याची दक्षता घेतली जाईल. यापूर्वी तीन योजनांचे एकत्रीकरण करून कर्जमाफी देण्यात आली होती. त्यामुळे बऱ्याच अडचणी आल्या होत्या. अद्यापही त्याची अंमलबजावणी झालेली नाही. मात्र हे सुटसुटीत होईल, असा प्रयत्न असेल.
कर्जमाफीच्या पहिल्या टप्प्यात बसणाऱ्या शेतकऱ्यांनी आपल्या बँकेचे पासबुक आणि आधार कार्ड ग्रामपंचायतच्या माध्यमातून बँकेत जमा करण्यासंदर्भात आपण अकोला जिल्ह्यात पालकमंत्री या नात्याने सूचना दिल्या असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. शालेय विद्यार्थ्यांना समाजाच्या आणि रुग्णांच्या वेदना कळाव्या यासाठी विद्यार्थ्यांची रुग्णालयांना सहामाही व्हिजिट ठेवण्यासंदर्भात परिपत्रक काढण्याचा सरकार विचार करीत आहे. सहलीच्या धर्तीवर ही व्हिजिट असेल. त्यातून रुग्णसेवेची भावना विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण व्हावी, हा हेतू आहे.
अकोल्यातील हत्येची घटना सर्वांसाठीच दुर्दैवी आहे. तपासासाठी चार पथके तयार करण्यात आली असून आयजी, एसपी यांच्या नेतृत्वात ही पथके काम करीत आहेत. चार-पाच दिवसात धागे गवसतील. सुपारी देण्याचा हा प्रकार आहे. या घटनेत गावठी बंदुका वापरण्यात आल्या होत्या. त्या येतात कशा हे सर्वांसाठी प्रश्नचिन्ह आहे.