‘सीएम’कडून वैद्यकीय मदतीचा वेग वाढला
By admin | Published: October 2, 2016 02:52 AM2016-10-02T02:52:01+5:302016-10-02T02:52:01+5:30
देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाल्यापासून मुख्यमंत्री साहाय्यता निधीच्या माध्यमातून हजारो गरजू रुग्णांना आर्थिक मदत करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता निधी : हजारो रुग्णांना ८३ कोटींची मदत
नागपूर : देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाल्यापासून मुख्यमंत्री साहाय्यता निधीच्या माध्यमातून हजारो गरजू रुग्णांना आर्थिक मदत करण्यात आली आहे. २२ महिन्यांत विविध आजारांनी ग्रस्त असलेल्या नागरिकांना थोडीथोडकी नव्हे तर ८३ कोटींहून अधिक रुपयांची मदत झाली आहे. या वर्षी एप्रिलपासून तर मदतीचे प्रमाण आणखी वाढले असून पाच महिन्यांतच ४५ कोटींहून अधिक निधीचे वाटप झाले आहे. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.
उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकाराअंतर्गत मुख्यमंत्री कार्यालयाकडे मुख्यमंत्री सहायता निधीबाबत विचारणा केली होती. राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून किती रुपयांची मदत झाली, किती नागरिकांचे अर्ज आले, यातील किती रुग्ण होते तसेच नैसर्गिक आपत्ती बाधितांच्या पुनर्वसनासाठी किती मदत करण्यात आली, इत्यादी प्रश्न त्यांनी विचारले होते. मुख्यमंत्री सचिवालयाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार १ जानेवारी २०१५ ते ३१ जुलै २०१६ या १९ महिन्यांच्या कालावधीत मुख्यमंत्री सहायता निधीतून वैद्यकीय मदत मिळावी यासाठी १२ हजार ५४९ नागरिकांचे अर्ज आले.
कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्या अर्जदारांना मदतीचे वाटप करण्यात आले. १ नोव्हेंबर २०१४ ते ३१ आॅगस्ट २०१६ या काळात अर्जदारांना ८३ कोटी ६ लाख १८ हजार ३४० रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. तर नैसर्गिक आपत्ती बाधितांचे पुनर्वसन व अपघाती मृत्यू प्रकरणांत २२ कोटी ७६ लाख ४२ हजार ५९ रुपयांची मदत करण्यात आली. एप्रिल २०१४ ते मार्च २०१६ या कालावधीत मुख्यमंत्री सहायता निधीत ३०२ कोटी ८४ लाख ५९ हजार ७९४ रुपयांचा निधी जमा होता. (प्रतिनिधी)
पाच महिन्यांत ४५ कोटींचे वाटप
मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्री कार्यालयात वैद्यकीय सहाय्यता कक्षच स्थापन करण्यात आला आहे. सुरुवातीला येणाऱ्या अर्जांचे प्रमाण कमी होते. परंतु आता ही संख्या हजारोंवर गेली आहे. १ एप्रिल २०१६ ते ३१ आॅगस्ट २०१६ या ५ महिन्यांच्या कालावधीतच ४५ कोटी १८ लाख ८० हजार ५७० रुपयांची मदत करण्यात आली.
कुठलाही अर्ज नाकारण्यात येत नाही
मुख्यमंत्री साहाय्यता निधीअंतर्गत वैद्यकीय मदतीबाबतचा अर्ज कधीही नाकारण्यात येत नाही, ही बाब या माहिती अधिकाराच्या माध्यमातून समोर आली आहे. अर्जासोबत प्राप्त झालेल्या कागदपत्रांची पडताळणी केली जाते. जर कागदपत्रांत काही त्रुटी असतील तर तसे अर्जदारांना कळविण्यात येते. आवश्यक कागदपत्रे प्राप्त झाल्यानंतर मदत पुरविण्यात येते. वैद्यकीय मदतीव्यतिरिक्त इतर प्रकरणांत मदत देणे हा मुख्यमंत्र्यांचा स्वेच्छाधिकार आहे, असेदेखील सचिवालयातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.