नागपुरात कापसी येथील कोल डेपोला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 12:51 AM2019-06-11T00:51:30+5:302019-06-11T00:52:29+5:30
भंडारा रोडवरील कापसी खुर्द येथील अग्रवाल कोल डेपोला सोमवारी भीषण आग लागली. या आगीत २०० टनापेक्षा अधिक कोळसा जळाला. परंतु अग्निशमन दलाच्या गाड्या वेळेत पोहोचल्याने जवळपास साडेआठ हजार टन कोळसा वाचविण्यात यश आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भंडारा रोडवरील कापसी खुर्द येथील अग्रवाल कोल डेपोला सोमवारी भीषण आग लागली. या आगीत २०० टनापेक्षा अधिक कोळसा जळाला. परंतु अग्निशमन दलाच्या गाड्या वेळेत पोहोचल्याने जवळपास साडेआठ हजार टन कोळसा वाचविण्यात यश आले.
अग्निशमन विभागातील सूत्रानुसार कोल कंपनीचे कर्मचारी राणे यांनी सकाळी ९ वाजता आग लागण्याची सूचना दिली होती. राणेने सांगितले की, उष्णतेमुळे डेपोने आग पकडली. यादरम्यान जोरात हवा आल्यामुळे आग आणखीन भडकली. घटनास्थळावर तत्काळ चार अग्निशमन गाड्या पाठविण्यात आल्या. कर्मचाऱ्यांनी बराच प्रयत्न केल्यावर आग नियंत्रणात आली. या आगीत नेमके किती नुकसान झाले, याचा अंदाज लावता आला नाही.
कामठी रोडवर ट्रकमधील कोळसा जळाला
याचप्रकारे कामठी रोडवर सयोना पब्लिक स्कूलजवळ ट्रक क्रमांक एमएच/४०/एके ०१५५ मध्ये असलेल्या कोळशाला अचानक आग लागली. ही घटना सोमवारी सकाळी १०.३० वाजता घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. सूचना मिळताच अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी पोहोचली. यानंतर आग नियंत्रणात आली.