कोळशाची आवक वाढली, पण संकट कायम; वीज यंत्रांची स्थिती संवेदनशील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2022 12:17 PM2022-04-27T12:17:58+5:302022-04-27T12:24:27+5:30
पूर्वी २५ रॅक कोळसा येत होता. त्याची संख्या वाढून ३० रॅक झाली आहे. आवक वाढल्यानंतरही वीज संयंत्रात कोळशाच्या स्टॉकची स्थिती अतिसंवेदनशील झाली आहे.
नागपूर : कोळशाच्या भीषण तुटवड्याचा सामना करीत असलेल्या महाराष्ट्रातील औष्णिक वीज केंद्रासाठी दिलासादायक बातमी आहे. रेल्वेकडे रिकाम्या रॅकची उपलब्धता वाढल्यामुळे कोळशाच्या आयातीत सुधारणा झाली आहे. पूर्वी २५ रॅक कोळसा येत होता. त्याची संख्या वाढून ३० रॅक झाली आहे. आवक वाढल्यानंतरही वीज संयंत्रात कोळशाच्या स्टॉकची स्थिती अतिसंवेदनशील झाली आहे.
महाजनकोचा दावा आहे की, गेल्या तीन दिवसात त्यांना सरासरी १ लाख ३५ हजार मेट्रिक टनाची आवक होत आहे. याशिवाय रस्ते मार्गाने दुर्गापूरवरून ६ हजार आणि भटाडी खाण येथून ८ हजार मेट्रिक टन कोळसा मिळू लागला आहे. गोडेगाव आणि इंदर खाणीतून कोराडी, खापरखेडा वीज केंद्राला ४ हजार मेट्रिक टन कोळसा मिळत आहे. परंतु महाजनकोच्या सूत्रांचा दावा आहे की, ही आवक सतत सुरु राहिल्यास समस्या सुटणार आहे. कंपनीसमोर वीज उत्पादन करणे आणि पावसाळ्यात स्टॉक तयार ठेवणे असे दुहेरी आव्हान आहे.
कोठे किती स्टॉक ?
केंद्र किती दिवसांचा कोळसा
कोराडी १.७५ दिवस
चंद्रपूर ६ दिवस
खापरखेडा ५.५ दिवस
नाशिक १.५ दिवस
भुसावळ १ दिवस
परळी ५ दिवस
पारस १.५ दिवस
चंद्रपुरात विक्रमी उत्पादन
भारनियमनाचा सामना करीत असलेल्या महाराष्ट्रातील चंद्रपूर येथील औष्णिक वीज केंद्राने या दरम्यान विक्रमी उत्पादन केले आहे. येथील ७ युनिट गेल्या २३ दिवसांपासून सातत्याने उत्पादन करीत आहेत. यापूर्वी डिसेंबर २०१८ मध्ये संयंत्राच्या युनिटकडून सतत २१ दिवसापर्यंत उत्पादन करण्यात यश मिळविले आहे. ऊर्जा मंत्री नितीन राऊत आणि महाजनकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे यांनी यासाठी कौतुक केले आहे.