नागपुरातील कोराडीला पोहोचले कोळसा माफियांचे टोळीयुद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2020 10:34 PM2020-07-30T22:34:49+5:302020-07-30T22:36:06+5:30
ग्रामीण पोलिसांच्या भागात सक्रिय वाळू आणि कोल माफियांमध्ये सुरू असलेल्या टोळीयुद्धात चंद्रपूरचा कुख्यात आरोपी शेख समीरने माऊझरच्या धाकावर एका युवकाला मारहाण केली. बुधवारी रात्री घडलेल्या या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ग्रामीण पोलिसांच्या भागात सक्रिय वाळू आणि कोल माफियांमध्ये सुरू असलेल्या टोळीयुद्धात चंद्रपूरचा कुख्यात आरोपी शेख समीरने माऊझरच्या धाकावर एका युवकाला मारहाण केली. बुधवारी रात्री घडलेल्या या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली. पोलिसांनी शेख समीर आणि त्याचा साथीदार ईश्वर ऊर्फ डायमंड मानकरविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
शेख समीर चंद्रपूरमधील वाळू आणि कोळसा माफिया आहे. त्याच्याविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न, दंगा यासह अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याचे साम्राज्य ग्रामीण पोलिसांच्या सीमेत पसरले आहे. त्याचा खापरखेड्यातील कुख्यात आरोपी इद्रिससोबत वाद सुरू आहे. तीन महिन्यांपूर्वी इद्रिस टोळीने समीरच्या कारला आग लावली. त्यानंतर दोघेही एकमेकांचा जीव घेण्यासाठी उतावीळ झाले आहेत. अल्तमश ऊर्फ लल्ला खान (३०) रा. स्मृती नगर आणि त्याचा साथीदार संदीप घुरोले हे त्याच्याबद्दल इद्रिसला माहिती देतात, असा समीरला संशय होता. त्यांच्या सांगण्यावरून इद्रिसने कार जाळल्याची समीरला शंका आली. त्याचा सूड घेण्यासाठी समीरने बुधवारी रात्री फोन करून लल्ला यास कोराडीला बोलाविले. तुझा मित्र संदीप माझ्याबद्दल इद्रिसला माहिती देत असल्याचे सांगून त्यास बोलाविण्यास सांगितले. संदीपला फोन लावताच समीरने लल्लाचा फोन हिसकावून घेतला. त्याने संदीपला जिवे मारण्याची धमकी दिली. त्याचे बोलणे ऐकून संदीपने फोन बंद केला. त्यामुळे समीरला राग आला. त्याने माऊझर दाखवून लल्लाला कारमध्ये बसविले. तुझ्यामुळे माझी ४.५० लाखाची कार जळाल्याचे सांगून पैसे न दिल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. मारहाण केल्यानंतर समीरने माऊझर ईश्वर ऊर्फ डायमंडला सोपविली. लल्लाने याबाबत कोराडी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी मारहाण, धमकावणे, हप्तावसुलीचा गुन्हा दाखल केला. समीर अनेक दिवसांपासून कोराडी परिसरात सक्रिय आहे. यापूर्वी त्याने कोराडीतील एका महिलेची छेड काढली होती. सूत्रांनुसार खापरखेड्यातील अनेक आरोपींनी कोराडी परिसरात बस्तान मांडले आहे. ते वाळूची तस्करी करतात. पोलिसांना माहीत असूनही कारवाई न झाल्यामुळे त्यांचे मनोबल उंचावले आहे.