काला पत्थर' होणार बंद; उमरेडच्या कोळसा खाणीचे उत्पादन कार्य ३१ मार्चपर्यंतच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 18:03 IST2025-03-11T18:02:20+5:302025-03-11T18:03:57+5:30

कोळसा उत्पादनास १९६६ ला प्रारंभ : बाजारपेठ होणार आणखी प्रभावित

Coal mine will be closed; Production operations at Umred's coal mine will remain open till March 31! | काला पत्थर' होणार बंद; उमरेडच्या कोळसा खाणीचे उत्पादन कार्य ३१ मार्चपर्यंतच!

Coal mine will be closed; Production operations at Umred's coal mine will remain open till March 31!

अभय लांजेवार 
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरेड :
उमरेड बोले तो 'विणकाम, कोळसा खदान, सावजी स्पेशल आणि अभयारण्य' अशी जगभरात ओळख आहे. विणकाम केव्हाचेच हद्दपार झाले. आशिया खंडाचा राजा 'जय' अफलातून कुठे आणि कुणी गायब केला. याचा शोध अद्याप लागला नाही. शिकारी टोळक्यांनी अभयारण्याची शान घालवली. सावजी खानावळी स्थिरावल्या. आता अवघ्या काही दिवसांत उमरेडचा 'काला पत्थर' बंद होण्याच्या मार्गावर आहे.


सन १९६६ ला उमरेड भूमिगत कोळसा खाणीचा जन्म झाला. उत्पादन कार्य सुरू झाले. तत्पूर्वी सर्वप्रथम सन १९६२ मध्ये राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ (एनसीडीसी) च्या मालकीची उमरेडची भूमिगत कोळसा खाण होती. त्यानंतर सन १९७५ ला वेस्टर्न कोलफिल्डस् लिमिटेडच्या मालकीची ही खाण झाली.


१३९ मीटर खोलात असलेल्या या भूमिगत कोळसा खाणीने आतापर्यंत हजारो कामगारांचा संसारगाडा सुखाने चालविला. राष्ट्रीय कार्यात आपला हातभार लावत उमरेडच्या कोळसा खाणीतून दर्जेदार कोळसा उत्पादनाचे कार्य आतापर्यंत पार पडले. 'जी-८' आणि 'जी-९' असा कोळशाचा दर्जा उत्तम प्रकारात मोडतो. पर्यावरण मंत्रालयानुसार उमरेड कोळसा खाणीचा विस्तार तब्बल ९४४.६५ हेक्टर आर क्षेत्रात आहे.


एकूण खाणयोग्य कोळसा साठा ९८.९० मेट्रिक टन असून, १ एप्रिल २०२१ ला ४.५ मेट्रिक टन कोळसा शिल्लक होता. आता राखीव कोळशाचे क्षेत्र शिल्लक नाही, असे पर्यावरण विभागाचे म्हणणे आहे. ३१ मार्च २०२५ ही उमरेड कोळसा खाणीच्या उत्पादनाची अखेरची तारीख आहे. १ एप्रिल २०२५ पासून या खाणीतून 'शून्य' उत्पादन असेल असे स्पष्ट झाले आहे.


उरल्या केवळ आठवणी...
विदर्भात माजरी (वणी), दुर्गापूर (चंद्रपूर) आणि उमरेड कोळसा खाण या तिन्ही काही ठराविक वर्षांच्या अंतरात सुरू झालेल्या खाणी आहेत. यापूर्वीच माजरी आणि दुर्गापूर खाणीचे उत्पादन बंद झाले. आता उमरेड कोळसा खाण काही दिवसांच्या उंबरठ्यावर उभी आहे. या खाणीसोबत हजारो कामगारांच्या घामाचा, त्यांच्या परिश्रमाचा आणि आठवणींचा ठेवा असून, आता केवळ आठवणीच उरतील, अशा भावनिक प्रतिक्रिया कष्टकऱ्यांच्या आहेत.


दमदार यंत्रसामग्री

  • सध्या उमरेड कोळसा खाणीत ८१६ कामगार कार्यरत आहेत. तीन पाळीत २४ तास कोळसा खाणीच्या उत्पादनाचे कार्य चालते. कोळसा उत्पादनासाठी ९ वाय ३ मॅरियन (सन १९६३) ही अमेरिका येथून आलेली मशीन होती. काही वर्षांतच सन १९७८ ला १५/९० ही रशियन मशीन उमरेड कोळसा उत्पादनासाठी मदतीला आली. दमदार यंत्रसामग्री आणि कामगारांच्या बळावर उत्पादनाचा वेग कमालीचा वाढला.
  • उमरेड कोळसा खाणीच्या माध्यमातून उत्पादनाचे रेकॉर्डब्रेकही २ झाले असून, ऐतिहासिक कामगिरीची नोंदही अनेकदा घेतली गेली आहे.


"रशियन १५/९० या मशीनचा सप्टेंबर २०१० ला मोठा अपघात झाला होता. या अपघातात गुरमेलसिंग या मशीन ऑपरेटरला आपला जीव गमवावा लागला. शेखर किनेकर गंभीर जखमी झाले. उमरेड कोळसा खाणीच्या आतापर्यंतच्या प्रवासातला हा एकमेव काळा डाग म्हणावा लागेल."
- गंगाधर रेवतकर, अध्यक्ष, वर्धा-नागपूर रिजन, इंटक

Web Title: Coal mine will be closed; Production operations at Umred's coal mine will remain open till March 31!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.