राज्यात कोळशाचा तुटवडा; वीजनिर्मितीवर संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 11:42 AM2018-10-11T11:42:14+5:302018-10-11T11:42:43+5:30
ऐन सण उत्सवाच्या कालावधीत राज्यात विजेचे संकट निर्माण झाले आहे. मागणी आणि पुरवठा यांच्यातील तफावत वाढल्याने लोडशेडिंग सुरू करण्यात आले आहे.
कमल शर्मा ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ऐन सण उत्सवाच्या कालावधीत राज्यात विजेचे संकट निर्माण झाले आहे. मागणी आणि पुरवठा यांच्यातील तफावत वाढल्याने लोडशेडिंग सुरू करण्यात आले आहे. यादरम्यान राज्यातील सर्व औष्णिक वीज केंद्रात कोळशाचा तुटवडा निर्माण झाल्याचे उघडकीस आले आहे. सातपैकी चार केंद्रांवर केवळ एक दिवस पुरेल इतकाच कोळसा शिल्लक आहे. या परिस्थितीत वीज वितरण कंपनी महावितरणसोबतच राज्य सरकारचाही ‘रक्तदाब’
वाढलेला आहे.
उल्लेखनीय म्हणजे अपुरा पाऊस झाल्याने मुंबई वगळून उर्वरित राज्यात विजेची मागणी गतीने वाढली आहे. मागणी आणि पुरवठा यातील अंतर २५० मेगावॅटपर्यंत पोहोचल्याने राज्यात जी १,जी २ आणि जी ३ फीडरवरील लोडशेडिंग लागू करण्यात आले आहे. अनेक दिवसानंतर याचा परिणाम नागपूर जिल्ह्यावरही पडला आहे. जिल्ह्यातील १८ फीडरवर लोडशेडिंग करावे लागेल. बुधवारी मागणीत थोडी कमी आल्याने लोडशेडिंगचा कालावधी कमी करण्यात आला. परंतु हा दिलासा अस्थायी स्वरूपाचा आहे. मागणी वाढल्याने परिस्थिती आणखी बिघडेल. तसेच विजेचे मुख्य स्रोत महाजेनकोच्या औष्णिक वीज केंद्रावरही ‘ऊर्जा’संकट आहे.
महाजेनकोनुसार त्यांच्या नाशिक, परळी, पारस आणि चंद्रपूर औष्णिक वीज केंद्रात केवळ एक दिवस पुरेल इतकाच कोळसा शिल्लक आहे. भुसावळ आणि खापरखेडा येथे अडीच दिवस पुरेल इतका स्टॉक आहे.
कोराडी वीज केंद्रात चार दिवसांचा स्टॉक आहे. परंतु तोसुद्धा आॅक्सिजनवर आहे. कारण नियमानुसार सात दिवसाचा कोळशाचा स्टॉक असल्यास वीज केंद्राला क्रिटिकल (संवेदनशील) श्रेणीत टाकले जाते. अशा परिस्थितीत राज्यातील सर्व औष्णिक वीज केंद्रांची स्थिती संवेदनशील झाली आहे. महाजेनको सूत्रांच्या दाव्यानुसार, एक दिवसही कोळशाची रॅक न पोहोचल्यास वीज केंद्रातील उत्पादन बंद होईल. परिस्थिती लक्षात घेता युनिटला क्षमतेपेक्षा कमी वीज उत्पादन करण्यास सांगण्यात आले आहे. परळी वीज केंद्रातील तीन, भुसावळ, कोराडी, खापरखेड्यातील प्रत्येकी दोन, नाशिक आणि चंद्रपूर येथील प्रत्येकी एक युनिट बंद आहे. दुसरीकडे कोयना जलविद्युत प्रकल्पासाठीचे पाणीही कमी करण्यात आले आहे. पॉवर एक्सचेंजमध्ये विजेचे सरासरी दर १०.६५ रुपये प्रति युनिटवर पोहोचले आहे. त्यामुळे वीज खरेदी करणेही कठीण झाले आहे.
दरवर्षीचे एकच रडगाणे
आॅक्टोबर महिन्यात लोडशेडींग ही सामान्य बाब झाली आहे. गेल्यावर्षी सुद्धा १७ आॅक्टोबर रोजी लोडशेडींग करावी लागली होती. तेव्हा कृषी पंपांचा वीज पूरवठा रात्री दोन तास कमी करण्यात आला होता. सध्या दिवसा आठ तास व रात्री दहा तास वीज पुरवठा केला जातो. २०१५ मध्ये फेब्रुवारी, जुलै, सप्टेंबर आणि आॅक्टोबर महिन्यात तर २०१६ मध्ये मे आणि सप्टेंबरमध्ये लोडशेडींग करावी लागली होती. याचे मुख्य कारण कोळश्याचा तुटवडा होच सांगण्यात आले होते. ओला कोळसा हेसुद्धा कारण सांगण्यात आले होते. अशा वेळी यापासून वाचण्यासाठी प्रभावी उपाययोजना का केल्या जात नाहीत, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
समन्वय साधण्याचा प्रयत्न
औष्णिक वीज केंद्रातील परिस्थितीरून महाजेनको आणि कोळसा पुरवठा करणारी कंपनी वेकोलि यांच्यात आरोप-प्रत्यारोप होत आहे. महाजेनकोचे म्हणणे आहे की, त्यांना पुरेसा कोळसा उपलब्ध होत नाही आहे तर वेकोलितील सूत्रांचे म्हणणे आहे की, कोळश्याची कुठलीही कमतरता नाही. दरम्यान बुधवारी महाजेनको आणि वेकोलि यांची उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीत वेकोलिने दावा केला की महाजेनकोच्या औष्णिक वीज केंद्रांना कोळसा उपलब्ध करण्यास त्यांची पहिली प्राथमिकता आहे. त्यामुळे वीज केंद्र एक दिवसही बंद पडू देणार नाही. परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे. रेल्वेशी समन्वय साधून कोळशाच्या रॅक वाढवण्यात आल्या आहेत.