अन् त्यांच्या छातीवर चढला कोबरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 12:11 AM2018-06-22T00:11:22+5:302018-06-22T00:12:06+5:30
कोबरा जातीचा साप जहाल विषारी मानला जातो. त्यामुळे हा साप पुढ्यात आल्यास चांगल्याचांगल्यांची घाबरगुंडी उडते. मग, हा साप कुणाच्या छातीवर चढून बसल्यास काय होईल? त्याची कल्पनाच केली जाऊ शकत नाही. परंतु, शहरातील एक व्यक्ती नुकतीच या अनुभवातून गेली. त्या रात्रीचा थरार त्यांच्या संपूर्ण कुटुंबीयांच्या अंगावर काटा आणतो. सुदैवाने वाचलो हे एकच वाक्य घटनेचा अनुभव सांगताना त्यांच्या मुखातून बाहेर पडते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोबरा जातीचा साप जहाल विषारी मानला जातो. त्यामुळे हा साप पुढ्यात आल्यास चांगल्याचांगल्यांची घाबरगुंडी उडते. मग, हा साप कुणाच्या छातीवर चढून बसल्यास काय होईल? त्याची कल्पनाच केली जाऊ शकत नाही. परंतु, शहरातील एक व्यक्ती नुकतीच या अनुभवातून गेली. त्या रात्रीचा थरार त्यांच्या संपूर्ण कुटुंबीयांच्या अंगावर काटा आणतो. सुदैवाने वाचलो हे एकच वाक्य घटनेचा अनुभव सांगताना त्यांच्या मुखातून बाहेर पडते.
विलास झोडे असे त्या व्यक्तीचे नाव असून बेलतरोडी पोलीस ठाण्यामागे त्यांचे घर आहे. गेल्या बुधवारी रात्री झोडे कुटुंबीय गाढ झोपेत होते. रात्री २ च्या सुमारास त्यांच्या घरात कोबरा जातीचा साप शिरला. त्या सापाने विलास यांच्या अंगावर चढल्यानंतर छातीवर ठाण मांडले होते. दरम्यान, विलास यांना हलकी जाग आली व त्यांनी काठी समजून सापाला खाली फेकले. खाली त्यांची पत्नी व मुले झोपले होते. तो साप त्यांच्या अंगावर पडला. त्यामुळे पत्नी खडबडून जागी झाली व त्यांनी सापाला चादरीसह फेकून दिले. त्यानंतर सापाने चादरीतून बाहेर पडून फणा काढला. तो बराचवेळ एकाच ठिकाणी घुटमळत राहिला. दरम्यान, झोडे कुटुंबीयांनी सर्पमित्र शुभम पराळे यांना बोलावून घेतले. शुभम व त्यांचे सहकारी अक्षय कुप्पलवार हे पहाटे ३ वाजता झोडे यांच्या घरी पोहोचले. त्यांनी सापाला पकडून बरणीत बंद करताच झोडे कुटुंबीयांनी सुटकेचा नि:श्वास घेतला. परंतु, ही घटना झोडे कुटुंबीयांना जीवनभराचा थरारक अनुभव देऊन गेली.
शुभम पराळे यांनी गेल्या काही दिवसांत यासह अन्य चार घरांतून साप पकडून त्यांना वनात सोडून दिले. त्यांनी दीक्षितनगर येथील मानस पाल यांच्या घरातून सँडबुआ हा अविषारी साप, हुडकेश्वर येथील देवा मेश्राम यांच्या घरातून कोबरा साप तर, चक्रपाणीनगर येथील मनोज तोटे व मानेवाडा येथील महादेव मिटकरी यांच्या घरातून वेगवेगळ्या जातीचे साप पकडले. परंतु, या सर्वांपेक्षा झोडे कुटुंबीयांना चांगलीच दहशत सहन करावी लागली.
नागरिकांनी सावध राहावे
पावसाळ्यात बिळामध्ये पाणी साचत असल्यामुळे साप बाहेर पडतात. परिणामी, या दिवसांत नागरिकांनी सापांपासून सावध राहण्याची गरज आहे. विषारी साप चावणे प्राणघातक ठरू शकते.
आर. एम. निंबेकर, आरएफओ.
अशी सावधगिरी बाळगा
१ - सापांचा वावर असलेल्या परिसरात जमिनीवर झोपणे टाळा.
२ - घराच्या परिसरातील काडीकचरा नष्ट करा.
३ - घरातील उंदराची बिळे बंद करा.
४ - शेतात काम करताना पूर्ण पाय झाकणारे जोडे घाला.
५ - दारे व खिडक्यांच्या फटी बंद करा.