कोकेनची तस्करी पकडली
By admin | Published: March 17, 2016 03:18 AM2016-03-17T03:18:55+5:302016-03-17T03:21:01+5:30
शहरात ६० लाख रुपये किमतीचे एक किलो ‘कोकेन’ जप्त करण्यात आले आहे.
तिघांना अटक :
६०.४५ लाखांचा माल जप्त
नागपूर : शहरात ६० लाख रुपये किमतीचे एक किलो ‘कोकेन’ जप्त करण्यात आले आहे. गुन्हेशाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई केली असून नागपुरातील ही पहिलीच कारवाई आहे. या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
प्रमोद रामभाऊ रावळे (३३) रा. पवन, शक्तीनगर, तुषार मधुकरराव हांडे (२२) रा. श्रावणनगर, नंदनवन आणि महेंद्र तुळशीराम लाकूडकर (२३) राजेंद्रनगर चौक, नंदनवन, अशी आरोपींची नावे आहेत. प्रमोद हा महेंद्रचा जावई असून तुषार मित्र आहे.
प्रभारी अप्पर पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी यासंबंधी पत्रकार परिषदेत माहिती देतांना सांगितले की, मंगळवारी गुन्हे शाखा पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती. त्या आधारावर मानेवाडा रोड आदिवासी कॉलनी जवळ प्रमोद पान पॅलेससमोर गुन्हेशाखेच्या पोलिसांनी तीन आरोपींना पकडले. त्यांच्याजवळील एका गुलाबी प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये एक किलो पांढरी पावडर होती. कुणालातरी देण्यासाठी ते घेऊन जात होते. नारकोटिक ड्रग डिटेक्शन किटद्वारे त्याची तपासणी केली असता ती पावडर कोकेन असल्याचे स्पष्ट झाले. एक किलो कोकेनची बाजारातील किंमत जवळपास ६० लाख रुपये इतकी आहे. कोकेनसह मोटारसायकल आणि ५ हजार रुपये किमतीचे चार मोबाईल, असा एकूण ६० लाख ४५ हजार रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला.
तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या विरुद्ध एनडीपीएस कायदा कलम २१ (सी), २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अफगाणिस्तानातून येतो माल
अफगाणिस्तान आणि नायजेरिया येथून तस्करीद्वारे कोकेन भारतात येते. भारतात पाच ते सहा हजार रुपये ग्रामप्रमाणे ते विकले जाते. आजपर्यंत नागपुरात कोकेनची कारवाई झालेली नाही. ज्यांना पकडण्यात आले. ते केवळ डिलिव्हरी बॉय असण्याची शंका आहे. यात आणखी आरोपी आहेत. कोकेन तस्करी करणारी टोळी यामागे असल्याची शक्यता नाकारता येत नाही.