‘कॉकटेल’ गारवा! उपराजधानीवर गुलाबी थंडीसह पाऊस, धुक्याची ‘दुलई’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2021 09:28 PM2021-12-28T21:28:16+5:302021-12-28T21:28:38+5:30
Nagpur News नागपूर शहर सकाळपासून दाट धुक्यात हरवले होते. आभाळात शुभ्र थर पसरला हाेता. सैरभैर उडणाऱ्या दवबिंदूमुळे वातावरणात अंगावर शहारे उठविणारा गारवा जाणवत हाेता.
नागपूर : ‘थर्टी फर्स्ट’चा उत्साह वाढायला अजून दाेन दिवस अवकाश आहे. पण मंगळवारचे वातावरण असेच माहाेल करणारे हाेते. सकाळ उगवली ती दाट धुक्याची चादर ओढूनच. नागपूर शहर सकाळपासून दाट धुक्यात हरवले होते. आभाळात शुभ्र थर पसरला हाेता. सैरभैर उडणाऱ्या दवबिंदूमुळे वातावरणात अंगावर शहारे उठविणारा गारवा जाणवत हाेता. दरराेज फेरफटका मारणाऱ्यांनी उबदार कपडे व कानाला मफलर बांधून हा आनंद अनुभवला तर बहुतेकांनी दुलईच्या उबदार पांघरुणात राहण्यातच धन्यता मानली.
हवामान खात्याने पावसाचा इशारा दिलाच हाेता पण हिवाळ्यातील गारव्याने त्यात धुक्याची भर टाकली. संपूर्ण शहर सकाळपासून धुक्याची चादर पांघरले हाेते. राजधानी दिल्लीत २०० मीटरपर्यंत दृश्यमानता राहत असल्याचे आपण ऐकत असताे. पण त्यात प्रदूषणाचे माेठे कारण आहे. ऑरेंज सिटीत नैसर्गिक धुक्यांमुळे दृश्यमानता २५ मीटरवर आली हाेती. हा अनुभव घेण्यासाठी एकतर विदेशात जावे लागते किंवा काश्मीर, कुल्लू मनालीची तरी सैर करावी लागते. अशा आल्हाददायक वातावरणाचा अनुभव नागपूरकरांनी मंगळवारी घेतला. सकाळी ९ वाजतानंतर हे धुके ओसरायला लागले. मात्र आकाशात ढगांचे आच्छादन कायम हाेते. सूर्य ढगांनी झाकलाच हाेता. त्यामुळे सकाळी उन्हात बसणाऱ्यांना नेहमीचा ‘सनबाथ’ मिळाला नाही व पांघरुणातच वेळ गेला. दिवसभर गारवा जाणवतच राहिला.
सायंकाळी मात्र काळ्या ढगांची गर्दी जमली आणि सूर्य अस्ताला जाण्यापूर्वी अंधार पसरला. खात्याच्या अंदाजानुसार हलक्या सरीही काेसळल्या. ढगाळ वातावरणाने रात्रीच्या तापमानात वाढ झाली असली तरी थंडीचा प्रभावही वाढला हाेता. या गारव्यामुळे नागरिकांना हुडहुडी भरवली. त्यामुळे उबदार आवरण अंगावर घेण्याच्या इच्छेने बाेचऱ्या थंडीचा अनुभव घेत घराकडे पळण्याचा वेगही वाढला हाेता. मात्र दाेन दिवसाचा ‘हिवसाळा’ ओसरल्यानंतर थंडीचा तडाखा वाढण्याचीच ही चाहूल म्हणावी लागेल.