मोबाईल वापरणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना आचारसंहिता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 09:38 PM2021-07-23T21:38:16+5:302021-07-23T21:39:07+5:30
Code of Conduct for mobile users officers मोबाईल वापरणाऱ्या शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने आचारसंहिता घालून दिली आहे. मोबाईलचा वापर करणारे अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून शिष्टाचार पाळला जात नसल्यामुळे विभागाने निर्देश दिले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मोबाईल वापरणाऱ्या शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने आचारसंहिता घालून दिली आहे. मोबाईलचा वापर करणारे अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून शिष्टाचार पाळला जात नसल्यामुळे विभागाने निर्देश दिले आहे.
अलीकडच्या काळात सुलभ व वेगवान संपर्क माध्यम म्हणून शासकीय कामकाजात भ्रमणध्वनीचा वापर अपरिहार्य बनला आहे. भ्रमणध्वनीच्या वापराबाबत काही वेळा अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून शिष्टाचार पाळण्यात येत नाही. त्यामुळे शासनाची प्रतिमा मलीन होते. शासकीय कामकाज करताना भ्रमणध्वनी वापराबाबत राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने २३ जुलै २०२१ अन्वये सूचना दिलेल्या आहेत.
काय आहेत सूचना
कार्यालयीन कामासाठी केवळ कार्यालयीन दूरध्वनीचा वापर करावा. कार्यालयीन वेळेत कार्यालयीन कामासाठी आवश्यक असेल तेव्हाच भ्रमणध्वनीचा वापर करावा. भ्रमणध्वनीवर बोलताना सौम्य आवाजात बोलावे. वाद घालू नये. असंसदीय भाषेचा वापर करू नये. कार्यालयीन कामासाठी भ्रमणध्वनीचा वापर करताना टेक्स मेसेजचा वापर करावा. तसेच संवाद साधताना कमी वेळेत साधावा. लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कार्यालयीन कॉल्सना तत्काळ उत्तर द्यावे. अत्यावश्यक वैयक्तिक दूरध्वनी कक्षाचे बाहेर जाऊन घ्यावेत. बैठकीत असताना आपला भ्रमणध्वनी सायलेंट/ व्हायब्रेटवर ठेवावा. बैठकीत असताना भ्रमणध्वनी तपासणे, संदेश तपासणे, इयर फोन वापरणे टाळावे. कार्यालयीन कामकाजासाठी दौऱ्यावर असताना भ्रमणध्वनी बंद ठेवण्यात येऊ नये.
सर्वांनी पालन करावे
राज्य शासनाने अधिकारी व कर्मचाऱ्यांना कार्यालयीन वेळेत भ्रमणध्वनी वापराबाबत परवानगी दिलेली आहे, मात्र काही शिष्टाचारदेखील घालून दिलेले आहेत. सर्वांनी शिष्टाचार पाळून शासनाची प्रतिमा मलीन होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन कास्ट्राईब जि.प. कर्मचारी संघटनचे जिल्हाध्यक्ष डॉ. सोहन चवरे यांनी केले आहे.