विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता : महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांची वाहने झाली जमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 08:37 PM2019-09-21T20:37:07+5:302019-09-21T20:39:56+5:30
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता शनिवारी दुपारी १२ वाजता लागू होताच पदाधिकाऱ्यांची शासकीय वाहने कार्यालयात जमा करून घेण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता शनिवारी दुपारी १२ वाजता लागू होताच पदाधिकाऱ्यांची शासकीय वाहने कार्यालयात जमा करून घेण्यात आली. महापौर, उपमहापौर, स्थायी समितीचे अध्यक्ष, विरोधी पक्षनेता यांच्यासह विविध समित्या व झोनच्या सभापतींची वाहने महापालिकेच्या मुख्यालयात जमा करण्यात आली.
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली तेव्हा महापौर नंदा जिचकार यांनी आपल्या घरीच वाहन परत केले. उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समितीचे अध्यक्ष प्रदीप पोहाणे महापालिका मुख्यालयात शासकीय वाहनाने पोहोचले. परंतु आचारसंहिता लागू झाल्यानंतर ते आपल्या बाईकने निघून गेले. प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, विशेष समिती सभापती तथा झोन समिती सभापतीचे वाहन आचारसंहिता लागू झाल्यानंतर त्वरित महापालिका मुख्यालयात परत करण्याचे आदेश सामान्य प्रशासन विभागाने जारी केले. संबंधित पदाधिकारी जेथे होते तेथेच त्यांना सोडून चालक वाहनासह महापालिका मुख्यालयात पोहोचले. शासकीय वाहन तसेच त्यांच्या चालकांची ड्युटी आता निवडणुकीत लागणार आहे. निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर पदाधिकाऱ्यांना वाहने परत मिळणार आहेत. दुपारी ३ वाजेपर्यंत सर्व वाहने महापालिकेत जमा करण्यात आली होती.