थंडी कायमच, गोंदियात पारा ७ अंशावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:08 AM2020-12-22T04:08:45+5:302020-12-22T04:08:45+5:30
नागपूर : दोन दिवसांपासून कडाक्याची थंडी पडायला लागल्याने नागपूरकर गारठले आहेत. शनिवारच्या तुलनेत तापमानाचा पारा ०.२ अंशाने अधिक दाखविला ...
नागपूर : दोन दिवसांपासून कडाक्याची थंडी पडायला लागल्याने नागपूरकर गारठले आहेत. शनिवारच्या तुलनेत तापमानाचा पारा ०.२ अंशाने अधिक दाखविला जात असला तरी गारवा मात्र कमी झालेला नाही. परिणामत: शहरात अनेक ठिकाणी शेकोट्या पेटलेल्या दिसू लागल्या आहेत.
शनिवारी नागपूरचे किमान तापमान ८.२ अंश सेल्सिअस होते. मागील २४ तासात यात बदल होऊन किमान तापमानाचा पारा ८.४ अंशावर आला आहे. फक्त ०.२ अंशाचा फरक पडला असल्याने हुडहुडी कायम आहे. शहरात कमाल तापमानाची नोंद २९ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आली. येथेही पारा २ अंशाने घसरला आहे. मागील २४ तासात तापमानात कालच्यापेक्षा नगण्य वाढ असली तरी विदर्भात सर्वच ठिकाणी थंडीचा कडाका कायम आहे. दिवसाही शहरात थंडा कायम होती. सोमवारी गोंदिया आणि यवतमाळ हे दोन जिल्हे विदर्भात सर्वात थंड होते. या दोन्ही ठिकाणी ७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. गोंदियाचे तापमान रविवारी ७.४ अंश नोंदविण्यात आले होते. त्यात ०.४ अंशाची घट झाली. नागपूरचे रविवारचे तापमान ८.४ अंश नोंदविण्यात आले आहे. बुलढाणा आणि अमरावती या दोन ठिकाणी तापमानाची नोंद अनुक्रमे ११.४ आणि ११.१ अंश घेण्यात आली आहे.
आठवडा थंडीचाच
हा संपूर्ण आठवडा थंडीचाच राहणार आहे. वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, या संपूर्ण आठवड्यात आकाश निरभ्र राहणार आहे. थंडीचा पारा किंचित घटणार असला तरी आठवडा मात्र कायम थंडीचा आहे. नागपुरात २६ डिसेंबरनंतर थंडी किंचीत कमी होऊ शकते. किमान तापमान १३ अंशापर्यंत पोहचण्याची शक्यता वेधशाळेने वर्तविली आहे. अन्य ठिकाणीही अशीच स्थिती राहणार आहे.
...
तापमान
अकोला ९.६ अं.से.
अमरावती ११.१
बुलडाणा ११.४
चंद्रपूर १०
गोंदिया ७
नागपूर ८.४
वर्धा ९.८
वाशिम १०
यवतमाळ ७
...