नागपुरात कडाक्याच्या थंडीत पोलिसांनी फोडला मद्यपींना घाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2019 10:45 PM2019-01-01T22:45:42+5:302019-01-01T22:49:54+5:30
थर्टी फर्स्टच्या सकाळपासून नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशीच्या पहाटेपर्यंत शहर पोलिसांनी जागोजागी कारवाई करून कडाक्याच्या थंडीत मद्यपींना घाम फोडला. मद्य प्राशन करून वाहन चालविणाऱ्या १०४५ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली तर, नियमांचे उल्लंघन करून वाहन चालविणाऱ्या ८८२ वाहनचालकांवरही पोलिसांनी कारवाई केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : थर्टी फर्स्टच्या सकाळपासून नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशीच्या पहाटेपर्यंत शहर पोलिसांनी जागोजागी कारवाई करून कडाक्याच्या थंडीत मद्यपींना घाम फोडला. मद्य प्राशन करून वाहन चालविणाऱ्या १०४५ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली तर, नियमांचे उल्लंघन करून वाहन चालविणाऱ्या ८८२ वाहनचालकांवरही पोलिसांनी कारवाई केली.
नवीन वर्षाच्या स्वागताच्या नावाखाली ३१ डिसेंबरच्या पूर्वसंध्येपासून काही वाहनचालक हुल्लडबाजी करतात. रस्त्याने किंचाळत, झिगझाग पद्धतीने वाहने चालवितात. दुसऱ्या वाहनचालकांना कट मारतात. त्यामुळे अपघात घडून नाहक कुणाच्या जीवाला धोका होतो तर काही जण जखमी होतात. असे होऊ नये म्हणून यंदा शहर पोलिसांनी खबरदारीच्या उपाययोजना केल्या होत्या. वाहतूक शाखेने वाहतुकीच्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर सकाळपासूनच कारवाईची विशेष मोहीम सुरू केली होती. त्यामुळे दारूड्या वाहनचालकांचा घोळका आणि त्यांच्यावर कारवाई करताना पोलीस जागोजागी दिसत होते. सोमवारी रात्री ८ वाजता पोलीस
आयुक्तांपासून(सीपी)तो पोलीस कॉन्स्टेबल(पीसी)पर्यंत सुमारे ४,५०० पोलीस शहराच्या रस्त्यावर उतरले. पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, सहआयुक्त रवींद्र कदम, अतिरिक्त आयुक्त बी. जी. गायकर आणि शहरातील बहुतांश पोलीस उपायुक्तांनी व्हेरायटी चौकात वाहनधारकांना गुलाबपुष्प तसेच शुभेच्छा देऊन सुरक्षेचा संदेशही दिला. नववर्षाचे स्वागत करताना जल्लोष करा मात्र कुणाला दुखापत होईल असे काही करू नका, पोलिसांना सहकार्य करा, असे आवाहन त्यांनी केले.
तेलंखेडी, फुटाळा, वेस्ट हायकोर्ट रोड, धरमपेठ, रहाटे चौक, अमरावती मार्ग, गिट्टीखदान आदी ठिकाणांसह १५० पॉईंटवर पोलिसांनी विशेष बंदोबस्त लावला होता. दारूड्या आणि हुल्लडबाजी करणाऱ्या वाहनचालकांना आवरण्यासाठी ब्रीथ अॅनालायझर आणि स्पीड गनचा वापर केला जात होता. दारूच्या नशेत वाहन चालविणाऱ्या तसेच हुल्लडबाजी करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी वाहतूक शाखेच्या ६१७ पोलिसांची ३० पथके शहरात वेगवेगळ्या भागात कारवाई करीत होती. कडाक्याच्या थंडीत पहाटेपर्यंत पोलीस दारूड्या वाहनचालकांवर कारवाई करताना दिसत होते. अवघ्या २४ तासात पोलिसांनी १०४५ वाहनचालकांवर कारवाई केली.
पहिल्यांदाच असे चित्र
विशेष म्हणजे, कडाक्याचा गारठा असूनही शहरातील सर्वच भागात पोलीस पहाटेपर्यंत रस्त्यावर उभे दिसत होते. पोलीस कर्मचारी नव्हे तर खुद्द पोलीस आयुक्त, सहआयुक्त, अतिरिक्त आयुक्त आणि बहुतांश पोलीस उपायुक्तही पहाटेपर्यंत रस्त्यावरच्या कारवाईचा आढावा घेताना दिसत होते. कारवाई करताना कोणताही उर्मटपणा पोलिसांकडून होताना पहिल्यांदाच दिसत नव्हता. वाहनचालकांना थांबवून त्याच्याशी बोलून संशय येताच ब्रीथ अॅनालायझरच्या माध्यमातून वाहनचालक दारूच्या नशेत आहे की नाही, त्याची खात्री केली जात होती. त्यानंतरच पोलीस कारवाई करीत होते.
एकाच दिवशी
पोलिसांनी अशाप्रकारे ३१ डिसेंबर २०१८ च्या सकाळपासून तो १ जानेवारी २०१९ च्या सकाळपर्यंत वाहनचालकांवर कारवाई करून २४ तासात चक्क ६ लाख ५७ हजारांचे तडजोड शुल्क वसूल केले. यापुढेही अशीच धडक मोहीम सुरू राहील, असे वाहतूक शाखेचे उपायुक्त राजतिलक रोशन यांनी सांगितले आहे. वाहनचालकांनी आवश्यक ती सर्व कागदपत्रे सोबत बाळगावीत, दारूच्या नशेत चुकूनही वाहन चालवू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.