शीतलहर... हुडहुडी भरली
By admin | Published: December 26, 2015 03:30 AM2015-12-26T03:30:06+5:302015-12-26T03:30:06+5:30
उत्तरेकडील शीतलहर आता उपराजधानीपर्यंत पोहोचली असून, नागपूरकरांनाही हुडहुडी भरली आहे.
गारठा वाढला : २४ तासात ५.३ अंशांनी तापमान घसरले
नागपूर : उत्तरेकडील शीतलहर आता उपराजधानीपर्यंत पोहोचली असून, नागपूरकरांनाही हुडहुडी भरली आहे. उपराजधानीतील किमान तापमान अचानक खाली घसरू न, पारा ८.१ अंशावर आला आहे. यामुळे शुक्रवारी यावर्षीच्या सर्वांत थंड दिवसाची नोंद झाली.
वातावरणात प्रचंड गारवा वाढला आहे. यामुळे मागील २४ तासात कमाल व किमान तापमान मोठ्या प्रमाणात खाली आले आहे. यात कमाल तापमान ५.३ अंशांनी तर किमान तापमान ३.२ अंश सेल्सिअसने खाली घसरले आहे. शिवाय काही दिवसांत ते पुन्हा दोन अंशांनी खाली उतरण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शुक्रवारी सकाळपासूनच बोचऱ्या थंडीसह वातावरणात गारवा जाणवत होता. यानंतर दुपारी थोडा दिलासा मिळाला. परंतु सूर्यास्त होताच पुन्हा कडाक्याच्या थंडीचा कहर वाढला. या बोचऱ्या थंडीचा नागपूरकरांना चांगलाच कहर सहन करावा लागत आहे. शुक्रवारी प्रत्येकजण गरम कपड्यांमध्ये दिसून येत होते. शिवाय रात्री अनेकांनी शेकोटीचा आसरा घेतला होता. जाणकारांच्या मते, डिसेंबर महिन्याच्या शेवटी किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सर्वांधिक थंडी असते. त्यानुसार मागील वर्षी २९ डिसेंबर रोजी उपराजधानीतील पारा ५ अंशापर्यंत खाली उतरला होता. तो आतापर्यंंतचा सर्वांत थंड दिवस मानला जातो. यावर्षी सुद्धा डिसेंबरच्या शेवटी पारा हा ८ अंशांपर्यंत खाली घसरला आहे. त्यासोबतच यावर्षी नागपुरातील किमान तापमान १० अंशापेक्षा खाली उतरले आहे.