हवेची दिशा बदलल्याने नागपुरातील थंडी आटोक्यात; १० डिसेंबरनंतर वाढू शकतो गारठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 10:57 PM2020-12-06T22:57:04+5:302020-12-06T22:57:28+5:30
Nagpur News weather हवेची दिशा बदलल्याने सध्या नागपुरातील रात्रीची थंडी बऱ्यापैकी आटोक्यात दिसत आहे. मात्र येत्या तीन ते चार दिवसात यात बदल होण्याची शक्यता असून त्यानंतर मात्र शहरातील आणि विदर्भातील वातावरणात गारठा वाढू शकतो, असा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हवेची दिशा बदलल्याने सध्या नागपुरातील रात्रीची थंडी बऱ्यापैकी आटोक्यात दिसत आहे. मात्र येत्या तीन ते चार दिवसात यात बदल होण्याची शक्यता असून त्यानंतर मात्र शहरातील आणि विदर्भातील वातावरणात गारठा वाढू शकतो, असा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे.
वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी वारा प्रति तास ३.६ प्रति किलोमीटर वेगाने वाहात होता. हवेची दिशा उत्तरेकडून दक्षिणेकडे वळताच शहरातील पारा घसरण्याची शक्यता आहे. नागपुरात रविवारी किमान तापमान ०.५ अंश सेल्सिअसवरून वाढून १२.९ अंशावर पोहचल्याची नोंद आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, बंगालच्या खाडीसोबतच झारखंड, हरियाणा, अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने अन्य भागामध्ये पारा घसरण्याची प्रक्रिया थांबली होती. बदललेल्या वातावरणात ८ डिसेंबरपर्यंत नागपुरात व परिसरातील अवकाशात हलके ढग राहतील. मात्र १० डिसेंबरनंतर पारा घसरण्याची शक्यता आहे.
नागपुरात रविवारी दिवसभर उन्ह पडले होते. यामुळे दिवसा पारा स्थिर होता. सामान्यापेक्षा दोन अंशाने घसरूनही थंडी जाणवली नाही. मात्र सूर्यास्तानंतर वेगाने थंडी जाणवायला लागली. विदर्भात १२.७ अंशाने गोंदिया आणि अकोलातील वातावरण रविवारी सर्वात थंड असल्याची नोंद झाली. तर वर्धा आणि वाशिममध्ये किमान तापमान १२.८ अंशाची नोंद झाली आहे.