थंडीत मसाल्याचे भाव ‘गरम’!
By Admin | Published: January 5, 2015 12:55 AM2015-01-05T00:55:22+5:302015-01-05T00:55:22+5:30
अवकाळी पावसामुळे पिकांना झालेले नुकसान आणि विदेशात मागणी वाढल्याने गेल्या काही दिवसांत जिरे, काळी मिरी, खसखस आणि अन्य मसाल्यांमध्ये तेजी आली आहे.
आणखी वाढीची शक्यता : अवकाळी पावसाने पिकांना नुकसान
नागपूर : अवकाळी पावसामुळे पिकांना झालेले नुकसान आणि विदेशात मागणी वाढल्याने गेल्या काही दिवसांत जिरे, काळी मिरी, खसखस आणि अन्य मसाल्यांमध्ये तेजी आली आहे. थंडीत मसाले गरम झाल्याने स्वयंपाकघरातील पक्वान्नांचा स्वाद काहीसा बिघडला आहे.
गेल्या १५ दिवसांत जिरे प्रति किलो ५० रुपयांनी वधारले आहे. भाव वाढल्याने स्टॉकिस्ट आणि सट्टेबाज सक्रिय झाले असून पुढेही भाववाढीची शक्यता आहे. सध्या जिऱ्याचा साठा कमी आहे. सध्या आवक गुजरातेतील ऊंझा येथून आहे.
निर्यातवाढीचा परिणाम
गोस्वामी यांनी सांगितले की, विदेशात जिऱ्याचे उत्पादन फारच कमी असल्याने निर्यात सुरू आहे. अशीच स्थिती राहिल्यास भाव प्रति किलो २०० रुपयांवर जाईल. याप्रकारे अन्य मसाल्याचे भावही वाढतील. विलायची प्रति किलो ४० रुपयांनी वधारली आहे. याशिवाय काळी मिरीच्या भावात निरंतर वाढ होत आहे. सरसूमध्ये ८ रुपयांची वाढ होऊन भाव ४० वरून ४८ रुपयांवर गेले आहेत. खसखसच्या भावात थोडीशी तर नारळाचे भाव वाढले आहेत. बाजारात ओव्याचे नवे पीक आले आहे. मेथीचे भावही वधारले आहे. मेथी दाणे प्रति किलो ७५ रुपयांवरून ९० रुपयांवर पोहोचले आहेत.
मालाची मोठ्या प्रमाणात खरेदी
बाजाराचे समीक्षक चंदन गोस्वामी यांनी सांगितले की, गुजरात राज्यातील राजकोट, जामनगर, राजस्थान येथील जोधपूर, किसनगड येथे जिऱ्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. गेल्या वर्षी जिऱ्याला योग्य भाव न मिळाल्याने यावर्षी शेतकऱ्यांनी अन्य पिकांवर लक्ष केंद्रित केले. त्यामुळे ४० टक्के लागवड कमी झाली.
तर दुसरीकडे गुजरातमध्ये पावसामुळे जिऱ्याचे पीक मोठ्या प्रमाणात खराब झाले. स्टॉकिस्ट आणि सट्टेबाजांनी मालाची मोठ्या प्रमाणात खरेदी केल्याने पुढेही तेजी राहण्याची शक्यता आहे. एक महिन्याआधी प्रति किलो ११० रुपये असलेले जिऱ्याचे भाव १६१ रुपयांवर पोहोचले आहेत.
प्लस फूड क्वालिटी जिरे १३५ रुपयांवरून १८० रुपयांवर गेले आहेत. आगामी काही दिवसातही ही भाववाढ कायम राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. (प्रतिनिधी)