विदर्भात शीतलहर सदृश्य स्थिती
By निशांत वानखेडे | Published: December 20, 2023 07:03 PM2023-12-20T19:03:27+5:302023-12-20T19:03:45+5:30
यवतमाळ गाेठले, नागपूर, चंद्रपूर, गडचिराेली गारेगार
नागपूर: विदर्भातील बहुतेक जिल्हे थंड लाटेच्या विळख्यात आले आहेत. यवतमाळात किमान तापमान पुन्हा सरासरीच्या ५.४ अंश खाली घसरले असून पारा ८.७ अंशावर पाेहचल्याने शरीर गाेठल्यागत स्थिती आहे. यासह नागपूर, भंडारा, गाेंदिया, चंद्रपूर, गडचिराेली हे जिल्हे गारेगार झाले आहेत.
उत्तर भारतातील थंड लाटेच्या प्रभावाने विदर्भात वातावरण चांगलेच थंड झाले आहे. मंगळवारच्या ढगाळ वातावरणामुळे नागपूर, गाेंदियात रात्रीच्या पाऱ्यात किरकाेळ वाढ झाली असली तरी ते १० अंशाच्या खालीच आहे. नागपूरला तापमान ९.८ अंश हाेते, जे सरासरीच्या २.२ अंश खाली आहे. सकाळच्या सुमारास घराबाहेर पडताच संपूर्ण शरीर थरथर कापायला लागते. थंडीचा प्रभाव दिवसाही जाणवत आहे. कमाल तापमान २६ अंशावर घसरले असून गारवा वाढला आहे.