उपराजधानी गारठली; पारा घसरला ५.३ वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2019 10:33 AM2019-12-30T10:33:52+5:302019-12-30T10:36:13+5:30
रविवारी थंडीच्या बाबतीत नागपूर विदर्भात दुसऱ्या क्रमांकावर राहिले. ५.१ अंश सेल्सिअसने चंद्रपूर पहिल्या क्रमांकावर राहिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर भीषण थंडीत सापडले आहे. सलग दुसऱ्या दिवशी किमान तापमान सरासरीपेक्षा ७ अंश सेल्सिअसने खाली घसरले असून, ५.३ अंशावर पोहोचले आहे. गेल्या २४ तासात ०.२ अंशाने पारा वर चढला असला तरी, थंडीपासून दिलासा मिळालेला नाही. त्यामुळे नागपूर सध्या अतिथंडीच्या विळख्यात सापडला आहे. डिसेंबर महिन्यातील उर्वरित दिवसातही यातून दिलासा मिळण्याची शक्यता नाही. रविवारी थंडीच्या बाबतीत नागपूर विदर्भात दुसऱ्या क्रमांकावर राहिले. ५.१ अंश सेल्सिअसने चंद्रपूर पहिल्या क्रमांकावर राहिले.
हवामान विभागानुसार, विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये किमान तापमान सरासरीपेक्षा ४ ते ८ अंश सेल्सिअसने खाली राहिले. त्यामुळे विदर्भात अतिथंडीची लाट पसरली आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड हवेमुळे दिवसाचे तापमानही खाली घसरले आहे. रविवारी नागपूरचे कमाल तापमान सरासरीपेक्षा ४ अंशाने कमी असून, २४.१ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. गेल्या २४ तासात कमाल तापमान ०.८ अंशाने घसरले. दिवस आणि रात्रीचे तापमान सरासरीपेक्षा खूप खाली आल्यामुळे कडाक्याची थंडी पसरली आहे. थंडीमुळे रविवारी लोक स्वेटर ऊनी कपडे दिवसभर घालून होते. डॉक्टरांनी लहान मुलं, वृद्ध, महिलांना थंडीपासून स्वत:चे संरक्षण करण्याचा सल्ला दिला आहे. अस्थमा, हार्ट, रक्तदाबाने पीडित व्यक्तींना थंडीपासून वाचण्यासाठी विशेष काळजी घ्यावी. गरम कपड्यांच्या मदतीने शरीरातील तापमान सामान्य ठेवण्याचा सल्लाही डॉक्टरांनी दिला आहे.
डिसेंबरचे ते दोन दिवस
थंडीच्या आकड्यांवर नजर टाकली तर डिसेंबर महिन्यातील दोन दिवस सर्वात संवेदनशील आहेत. ते म्हणजे २८ व २९ डिसेंबर. आतापर्यंत यावर्षी २८ डिसेंबर रोजी पारा हा ५.१ अंश सेल्सिअसवर पोहोचला होता. तो या मोसमातील सर्वात थंड दिवस ठरला. २९ डिसेंबर रोजी पारा ५.३ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आला. इतकेच नव्हे तर किमान तापमानातील आकड्यांवर नजर टाकली तर २९ डिसेंबर २०१८ रोजी (३.५ अंश सेल्सिअस) आतापर्यंतचा सर्वाधिक थंड दिवस नोंदवण्यात आला आहे. २९ डिसेंबर २०१४ रोजी ५ अंश सेल्सिअस तापमान होते. २९ डिसेंबर १९६८ रोजी ५.५ अंश तापमान नोंदवण्यात आले. तर कालच २८ डिसेंबर २०१९ रोजी तापमान ५.१ अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आले. २८ डिसेंबर १९८३ व २८ डिसेंबर २०१८ रोजी ५.७ अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदवले गेले.