उपराजधानीत १८ परीक्षा केंद्रात सामूहिक कॉपी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2020 08:20 PM2020-03-05T20:20:02+5:302020-03-05T20:20:25+5:30
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नागपूर विभागीय कार्यालयाला १८ परीक्षा केंद्रांमध्ये सामूहिक कॉपी झाल्याचा ऑनलाईन अहवाल सादर झाला आहे.
आशिष दुबे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मथळा वाचून आपण चकित झाला असाल. परंतु, हे सत्य आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नागपूर विभागीय कार्यालयाला १८ परीक्षा केंद्रांमध्ये सामूहिक कॉपी झाल्याचा ऑनलाईन अहवाल सादर झाला आहे. त्यामुळे विभागीय कार्यालयात खळबळ माजली आहे.
या अहवालाशी संबंधित दुसरी धक्कादायक बाब म्हणजे, अहवालातील कॉपी करणाऱ्यांच्या स्तंभात परीक्षा दिलेल्या सर्वच विद्यार्थ्यांची संख्या नमूद करण्यात आली होती. त्यामुळे ताबडतोब हालचाली करून अहवालात सुधारणा करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले. आश्चर्य म्हणजे हा प्रकार केवळ एक-दोनदा झाला नाही. इयत्ता बारावीनंतर इयत्ता दहावीच्या परीक्षेचेही याच पद्धतीचे अहवाल पाठविले गेले. कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या स्तंभात परीक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांची संख्या लिहिण्यात आली. मंडळाच्या अधिकाऱ्यांनी ही चूक अनवधानाने होत असल्याचे स्पष्ट केले. तसेच, संबंधितांना सुधारित अहवाल पाठविण्याचे व यापुढे सतर्क राहण्याचे निर्देश दिल्याचे सांगितले. विशेष म्हणजे, परीक्षा केंद्र अधिकाऱ्यांना परीक्षेपूर्वी प्रशिक्षण देण्यात आले होते. त्यात आॅनलाईन अहवाल कसा तयार करायचा याची माहिती देण्यात आली होती. असे असताना चुकीचे अहवाल पाठविण्यात आले.
यामुळे मागितली ऑनलाईन माहिती
परीक्षा योग्य पद्धतीने पार पडल्याचा व भरारी पथकाने प्रभावी कार्य केल्याचा दावा मंडळाच्या वतीने दरवर्षी केला जातो. परंतु, वास्तव वेगळे राहते. त्यामुळे यावर्षी इयत्ता बारावीच्या परीक्षेपूर्वी पुणे मुख्यालयात बैठक घेण्यात आली. त्यात परीक्षा केंद्रातील व्यवस्था व भरारी पथकाच्या सक्रीयतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. तसेच, परीक्षा केंद्रातील इत्थंभूत माहिती आॅनलाईन मागवण्याचा निर्णय घेण्यात आला व अहवालाची रचना ठरविण्यात आली.