बंधनातून मुक्तीसाठी स्त्रीशक्तीचे सामूहिक बंड

By admin | Published: March 11, 2017 02:51 AM2017-03-11T02:51:49+5:302017-03-11T02:51:49+5:30

सावित्रीआई, जोतिबांनी भारतातील ज्या मुलींसाठी शिक्षणाचे द्वार खुले करून हजारो वर्षांच्या गुलामगिरीच्या बेड्या झटक्यात तोडून दिल्या

Collective rebellion of manpower for liberation from bondage | बंधनातून मुक्तीसाठी स्त्रीशक्तीचे सामूहिक बंड

बंधनातून मुक्तीसाठी स्त्रीशक्तीचे सामूहिक बंड

Next

सावित्रीआईला मानाचे अभिवादन : देशभरातील हजारो महिलांचा स्वातंत्र्यासाठी एल्गार
नागपूर : सावित्रीआई, जोतिबांनी भारतातील ज्या मुलींसाठी शिक्षणाचे द्वार खुले करून हजारो वर्षांच्या गुलामगिरीच्या बेड्या झटक्यात तोडून दिल्या त्या मुलींनी आज प्रगतीचे मुक्त आकाश गाठले आहे. मात्र आता गुलामीच्या बेड्या पुन्हा या मुलींना बांधू पाहत आहेत. कधी धर्माच्या नावाने, पुरुषत्वाच्या मानसिकतेने, समाजाच्या भीतीने आणि आता सुरक्षेची आपुलकी दाखवून वसतिगृहाच्या चार भिंतीआड डांबले जात आहे. सावित्रीने दिलेले मुक्त आकाश हिसकावू पाहत आहे. परंतु आता नाही. मनुवादी शक्तींच्या विरोधात आता बंड करावेच लागेल. ‘हमे चाहिए आझादी...’ म्हणत देशभरातील महिला शक्तीने गुरुवारी नागपूरच्या इंदोरा मैदानातून बंधनमुक्तीचा एल्गार पुकारला.

विद्याज्योती व क्रांतिज्योती सावित्रीआई फुले यांच्या १२० व्या पुण्यतिथीनिमित्त शेड्यूलकास्ट फेडरेशनच्या बॅनरखाली ७५ व्या राष्ट्रीय महिला परिषदेचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले. ही परिषद अनेक अंगाने ऐतिहासिक ठरली. बौद्ध, दलित, मुस्लिम, आदिवासी, बहुजन, कष्टकरी, धार्मिक व वांशिक अल्पसंख्यक महिला, भटक्या जमातीतील महिला, लैंगिक कामगार, समलैंगिक, असंघटित क्षेत्रातील महिला अशा सर्वच समाज घटकातील महिला प्रतिनिधी, कार्यकर्ते या परिषदेत सहभागी झाले होते. देशाच्या उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत आणि पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत समाजाच्या विविध घटकांमध्ये सेवेचे, जागृतीचे काम करणाऱ्या शेकडो महिला कार्यकर्त्या, नेत्या परिषदेला उपस्थित होत्या. फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांचा वारसा चालविताना देशात निर्माण झालेल्या असहिष्णुतेमुळे दुखावलेल्या संघटनांचे कार्यकर्ते सहभागी होते. रोहित वेमुलाच्या हैदराबाद विद्यालयातील विद्यार्थ्यांसह ‘पिंजरा तोड’ आंदोलनातून देशभरातील मुलींना जागविणाऱ्या दिल्ली विद्यापीठाचे विद्यार्थी, जेएनयू, पुणे, बेंगलोर विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे ग्रुप परिषदेला सहभागी झाले होते. दिल्ली, गुजरात, पंजाब, हरियाणा, मुंबई, पुणे, आंध्र प्रदेश, बंगाल, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आदी राज्यातील जवळपास ५००० महिलांनी परिषदेला हजेरी लावली.
हैदराबादच्या रोहित वेमुलाच्या मृत्यूने शिक्षणाच्या क्षेत्रात पसरलेल्या मनुवादाचा चेहरा समोर आला. गुजरातच्या उनामध्ये गोमांसच्या कारणावरून दलित तरुणांना झालेली सार्वजनिक मारहाण, मुजफ्फरपूर दंगे, अकलाखचे प्रकरण, दाभोलकर-पानसरे-कलबर्गी यांची हत्या, जेएनयूचा मुद्दा आणि नुकतेच वसतिगृहातील मुलींना सुरक्षेच्या कारणावरून बंधन घालण्याचा प्रकार अशा विविध घटनांचे पडसाद परिषदेत उमटले. देशात वाढणारी असहिष्णुता, विषमता, धार्मिक कट्टरवाद याबद्दलचा रोष परिषदेत उमटला. मनुवादाच्या बुरख्यात असलेला धार्मिक कट्टरवाद, द्वेष, लिंगभेद याविरोधात ‘चलो नागपूर’चा नारा देत या शक्तींविरोधात संघटितपणे लढण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
देशभरातून आलेल्या विद्यार्थिनी, महिला, कार्यकर्त्यांनी गीत, संगीत, नृत्य, कला, कविता, नाटकांच्या सादरीकरणाच्या माध्यमातून न्याय, मैत्री, शांतता, स्वातंत्र्य, समानता, आत्मसन्मान प्रस्थापित करण्याचा आवाज उठविला. आम्ही मुक्त आहोत, आम्हाला कुणी बंधन घालू नका. आम्हालाही माणूस म्हणून समानतेने जगू द्या. वाढती असमानता, असहिष्णुतेला व आवाज दडपण्याच्या प्रयत्नांना आव्हान देण्याचे बंड परिषदेतून केले आहे.
प्रा. अभिनया कांबळे, अजिता राव, अनिता घई, बिट्टू कार्तिक कोण्डय्या, छाया खोब्रागडे, दुर्गा झा, इलिना होरो, हसिना खान, जया शर्मा, किरण देशमुख, लता प्रमा, मुजफ्फरपूर क्षेत्रात काम करणाऱ्या माधवी कुकरेजा, आंध्रप्रदेशच्या कार्यकर्त्या डॉ. मनिषा बांगर, गुजरातमध्ये आंबेडकरी विचारांचा प्रसार करणाऱ्या मंजुला प्रदीप, मारिया सलीम, मीना सेशु, मनिषा बहल, निवेदिता मेनन, निशा शेंडे, रजनी तिलक, रितूपर्णा बोरा, संगीता महाजन, शबनम हाशमी, शबिना मुमताज, शंभवी विक्रम, श्यामल गरुड, अ‍ॅड. स्मिता कांबळे, सरोज आगलावे, कुमुद पावडे, तक्षशिला वाघधरे, रुबिना पटेल, शोमा सेन, तृतीय पंथीय अर्चना, सेक्सवर्करच्या हक्कासाठी काम करणाऱ्या प्रतिनिधी, जेएनयू, हैदराबाद, दिल्ली विद्यापीठाच्या प्रतिनिधींनी यावेळी आपले विचार व्यक्त केले.(प्रतिनिधी)

 

Web Title: Collective rebellion of manpower for liberation from bondage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.