संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकारी स्वत: गावभेटीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 09:56 PM2021-05-08T21:56:05+5:302021-05-08T22:00:40+5:30
Collector, village visit to prevent infection प्रशासनाकडून सर्व प्रयत्न केल्यानंतरही अनेक गावांमध्ये लसीकरणाला प्रतिसाद मिळत नसल्याचे पुढे आले आहे. तसेच अनेक गावांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याचे अहवाल आहेत. प्रत्येक तालुक्यातील अशी गावे निवडून त्या ठिकाणी अधिकारी व तालुक्यातील कर्मचाऱ्यांचा प्रत्यक्ष भेटीचा दौरा कार्यक्रम नागपूर जिल्ह्यात सुरू करण्यात आला आहे. शनिवारी स्वत: जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी काही गावांना भेटी देऊन आढावा घेतला, हे विशेष.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रशासनाकडून सर्व प्रयत्न केल्यानंतरही अनेक गावांमध्ये लसीकरणाला प्रतिसाद मिळत नसल्याचे पुढे आले आहे. तसेच अनेक गावांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याचे अहवाल आहेत. प्रत्येक तालुक्यातील अशी गावे निवडून त्या ठिकाणी अधिकारी व तालुक्यातील कर्मचाऱ्यांचा प्रत्यक्ष भेटीचा दौरा कार्यक्रम नागपूर जिल्ह्यात सुरू करण्यात आला आहे. शनिवारी स्वत: जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी काही गावांना भेटी देऊन आढावा घेतला, हे विशेष.
गेल्या काही दिवसांत नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढत आहे; त्यामुळे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी शुक्रवारी संपूर्ण जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील गावागावांचा ऑनलाईन आढावा घेतला. त्यानंतर ज्या गावांमध्ये संख्या वाढली आहे, त्या गावांत संबंधित तालुक्याचे तहसीलदार, गटविकास अधिकारी, संबंधित ग्रामसेवक, तलाठी, ग्रामपंचायतीचे नियुक्त पालक अधिकारी, नियुक्त लसीकरणासंबंधी शिक्षक, अंगणवाडी सेविका, कृषी सहायक, आशा वर्कर या सर्वांनी कोविड प्रोटोकॉल पाळत सरपंच सदस्य यांच्यासह गावांना भेटी देण्याचे निश्चित केले आहे. या ठिकाणी येणाऱ्या अडचणींचा अहवाल सादर करण्याचेसुद्धा निर्देशित करण्यात आले असून, माघारलेली ही गावे आरोग्यदृष्ट्या जागृत करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. ८ मेपासून याची सुरुवात झाली असून, शनिवारी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी स्वत: सावरगाव, मोगरा, मोवाड, खेरगाव या गावांना भेट दिली. गावकरी व अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यानंतर तालुकास्तरावरील अधिकाऱ्यांचा गावनिहाय दौरा निश्चित करण्यात आला आहे. ते संबंधित गावांना भेट देऊन, तेथील पाहणी करून आपला अहवाल सादर करतील.