जिल्हाधिकारी कार्यालय आता सकाळी ९.४५ वाजता उघडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:07 AM2021-07-15T04:07:52+5:302021-07-15T04:07:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : जिल्हाधिकारी कार्यालयातील वेळ ४५ मिनिटांनी वाढवण्यात आली आहे. मुळात राज्य शासनाचे हे पूर्वीचेच आदेश ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्हाधिकारी कार्यालयातील वेळ ४५ मिनिटांनी वाढवण्यात आली आहे. मुळात राज्य शासनाचे हे पूर्वीचेच आदेश असून त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश नवनियुक्त जिल्हाधिकारी आर. विमला यांनी दिले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालय व त्याच्याशी संबंधित सर्व विभाग व शाखांच्या कार्यालयांची वेळ आता सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ अशी करण्यात आली आहे. तसेच जेवणासाठीची सुटीसुद्धा दुपारी १ ते २ या वेळेमध्ये जास्तीत जास्त अर्ध्या तासाची राहील. येत्या सोमवारपासून याची अंमलबजावणी करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने सर्व विभागांना दिले आहेत. कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी वेळेवर येत नसल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे.
शासकीय कार्यालयातील अधिकारी कर्मचारी हे वेळेवर कार्यालयात येत नाही, अशी तक्रार नेहमीच होत असते. नवनियुक्त जिल्हाधिकारी आर. विमला यांनाही हा अनुभव आला. जिल्हाधिकारी पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर मंगळवारी त्यांनी सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व विभागांना आकस्मिक भेट दिली. तेव्हा बहुतांश विभागातील अधिकारी-कर्मचारी वेळेवर कामावर उपस्थित नसल्याचे आढळून आले. त्यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. इतकेच नव्हे त्यांनी ही बाब अतिशय गांभीर्याने घेतली. शासकीय कार्यालयातील कामकाजाची वेळ ही ४५ मिनिटांनी वाढविण्याबाबत राज्य शासनाने २४ फेब्रुवारी २०२० रोजी आदेश जारी केले आहेत. त्याची अंमलबजावणी करीत उपरोक्त आदेश दिले. त्यानुसार निवासी उपजिल्हाधिकारी अविनाश कातडे यांनी बुधवारी यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत. कार्यालयातील शिपायांसाठी सकाळी ९.३० ते साायंकाळी ६.३० अशी वेळ राहील. यानुसार येत्या सोमवारपासून या आदेशाची कडक अंमलबजावणी केली जाईल.