कॉलेजची वर्गखोली अन कँटीन... कधी होणार थेट भेट ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:07 AM2021-07-15T04:07:08+5:302021-07-15T04:07:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोनामुक्त गावांमध्ये शाळा सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. परंतु महाविद्यालयांसंदर्भात अद्यापही पाऊल उचलण्यात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनामुक्त गावांमध्ये शाळा सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. परंतु महाविद्यालयांसंदर्भात अद्यापही पाऊल उचलण्यात आलेले नाही. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांमध्ये मार्च २०२० पासून ऑनलाईन अभ्यास सुरू आहे. कोरोनाबाधितांची संख्या कमी झाली असताना आता तरी महाविद्यालये उघडतील का, असा प्रश्न विद्यार्थ्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे.
विशेष म्हणजे महाविद्यालयांचीदेखील ऑफलाईन वर्ग सुरू करण्याची तयारी आहे. अनेक महाविद्यालयांत शिक्षक वर्गखोल्यांमध्ये जाऊन ऑनलाईन वर्ग घेत आहेत; परंतु शासनाकडून निर्देश आले नसल्यामुळे महाविद्यालयांचाही नाइलाज आहे.
नागपूर विद्यापीठातर्फे संचालित व संलग्नित महाविद्यालयांची एकूण संख्या ५०७ इतकी आहे. महाविद्यालये व पदव्युत्तर विभागांमध्ये सव्वादोन लाखांहून अधिक विद्यार्थी प्रवेशित आहेत. यात पदवी, पदव्युत्तर व पदविका अभ्यासक्रमांतील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. मागील १७ महिन्यांपासून विद्यार्थी महाविद्यालयांत गेलेले नाहीत. अनेकांनी तर एकदाही महाविद्यालयांचे तोंडदेखील पाहिलेले नाही. कोरोनाची स्थिती नियंत्रणात आली असताना आता तरी महाविद्यालये सुरू करावीत, अशी अपेक्षा विद्यार्थ्यांकडून व्यक्त होत आहे. ‘ऑनलाईन’ माध्यमातूनच शिक्षण सुरू आहे. मात्र ‘ऑनलाईन’ वर्गांमध्ये विद्यार्थी लक्ष केंद्रित करू शकत नाहीत. इंटरनेट, गोंगाट, कनेक्टिव्हिटी, इत्यादी मुद्द्यांमुळे अनेक जणांना वर्गात शिकविले जाणारे मुद्देदेखील नीट कळत नाहीत. मित्र-मैत्रिणी दिसतात, मात्र त्यांच्याशी बोलूदेखील शकत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना महाविद्यालयांची प्रचंड ओढ लागली आहे.
नियमांचे पालन करू; पण प्रत्यक्ष वर्ग सुरू करा
आम्ही मागील अनेक महिन्यांपासून ऑनलाईनच अभ्यास करतो आहे; परंतु प्रत्यक्ष वर्गखोलीतील अभ्यासाची त्याला सर नाही. महाविद्यालयीन जीवनातील अनेक अनुभवांना आम्ही मुकलो आहे. अगोदरची स्थिती आम्ही समजू शकतो. मात्र आता कोरोना नियंत्रणात आला आहे. आम्ही पूर्ण नियमांचे पालन करू; पण आता प्रत्यक्ष वर्ग सुरू झाले पाहिजेत.
- यश तिवारी, विद्यार्थी
आणखी किती काळ प्रतीक्षा?
महाविद्यालयातील प्रात्यक्षिके आणि ऑनलाईन प्रात्यक्षिके यांत बराच फरक पडतो. काही अभ्यासक्रमांना प्रत्यक्ष उपस्थितीच आवश्यक असते. संकटाच्या काळातील स्थिती आम्हालादेखील माहीत होतीच. परंतु आता शासनाने पुढाकार घ्यावा व नियमांचे पालन करण्याचे हमीपत्र घेऊन वर्ग सुरू करावेत.
नीलेश उपाध्ये, विद्यार्थी
विद्यापीठाच्या निर्देशांचे पालन करणार
कोरोनामुळे महाविद्यालयांतील ऑफलाईन वर्ग बंद असले तरी ऑनलाईन शिक्षण नियमितपणे सुरूच आहे. विद्यार्थ्यांकडून आम्हाला विचारणा होते. मात्र सध्याची स्थिती पाहता वर्ग सुरू होतील की नाही, हे सांगणे कठीण आहे. शासन व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाकडून जे काही निर्देश येतील, त्यांचे तंतोतंत पालन करण्यात येईल.
- डॉ. गजानन पाटील, प्राचार्य, अण्णासाहेब गुंडेवार महाविद्यालय
विद्यापीठांतर्गत येणारी एकूण महाविद्यालये : ५०७
विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा : ९६,९५६
वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा : ६२,९१६
मानव्यविज्ञान विद्याशाखा : ६१,५६२
आंतरशास्त्रीय विद्याशाखा : १४,१३१