समाजकार्य महाविद्यालयांनी आर्थिक परिवर्तनासाठी पुढाकार घ्यावा :नितीन गडकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 10:43 PM2018-12-29T22:43:35+5:302018-12-29T22:45:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : निसर्गातील कोणतीच वस्तू टाकाऊ नाही. प्रत्येक वस्तूपासून काहीतरी निर्माण करता येते. उपलब्ध ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : निसर्गातील कोणतीच वस्तू टाकाऊ नाही. प्रत्येक वस्तूपासून काहीतरी निर्माण करता येते. उपलब्ध तंत्रज्ञानाचा वापर करून ग्रामीण भागातील नागरिकांचे जीवनमान उंचावता येते. त्यामुळे समाजकार्य महाविद्यालयांनी सामाजिक, आर्थिक परिवर्तनाच्या प्रक्रियेत ग्रामीण भागातील नागरिकांना सहभागी करून घेण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
महाराष्ट्र असोसिएशन ऑफ सोशल वर्क एज्युकेटर्स(मास्वे)च्या वतीने वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित राष्ट्रीय कार्यशाळेत लोककेंद्री पर्यावरणपूरक पायाभूत विकास या विषयावर ते बोलत होते. व्यासपीठावर मास्वेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अंबादास मोहिते, अध्यक्ष डॉ. दीपक वलोकर, सचिव डॉ. अनंत बरडे, डॉ. दिलीप बाराहाते, डॉ. विजय शिंगणापूरे, मातृसेवा संघ समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जॉन मेनाचेरी उपस्थित होते. गडकरी म्हणाले, गडचिरोलीला बायो एव्हीएशन फ्युएल हब म्हणून विकसित करण्यात येत आहे. डेहराडून ते दिल्ली स्पाईस जेट विमानात २५ टक्के जैविक इंधन वापरून यशस्वी प्रयोग करण्यात आला आहे. गडचिरोलीच्या भागात जट्रोफा, रतनज्योत, करंज यासारख्या जैविक इंधन देणाऱ्या वनस्पतींची उत्पादन वाढविण्यात येत आहे. यामुळे नागरी उड्डयण क्षेत्र आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊन ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी निर्माण होतील. माळरानावर या वनस्पतींची लागवड करता येऊ शकते. यात सामाजिक सहभाग महत्त्वाचा आहे. समाजकार्य विद्यालयातील विद्यार्थ्यांना जट्रोफा, बांबू लावण्यासाठी प्रोत्साहन देण्याची गरज आहे. नागपुरात जैविक इंधनावर ३५ बसेस चालविण्यात येत आहेत. यात ट्रॅक्टरमध्ये हे इंधन वापरल्यामुळे दरवर्षी शेतकऱ्यांचे १५ ते १६ हजाराची बचत होत असल्याचे त्यांनी सांगितले. सकाळच्या सत्रात समाजकार्य शिक्षण आणि त्यापुढील आव्हाने या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. या विषयावर बोलताना जागतिक बँकेचे सल्लागार श्रीकांत बाराहाते यांनी समाजकार्य पदवी पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांनी नागरिक, प्रशासनात दुवा म्हणून कार्य करण्याचे आवाहन केले. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सचे माजी प्रोफेसर डॉ. मुरली देसाई यांनी समाजकार्य महाविद्यालयांमधील अभ्यासक्रमाचा दर्जा वाढविण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. नेहरू युवा केंद्र अमरावतीच्या जिल्हा समन्वयक ज्योती मोहिते यांनी समाजकार्य महाविद्यालयात ग्रामीण विकासाचे तंत्र विद्यार्थ्यांना शिकविण्याची गरज असल्याचे सांगितले. संचालन डॉ. जॉन मेनाचेरी यांनी केले. आभार डॉ. शिवपुत्र कुंभार यांनी मानले.