अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेवर महाविद्यालयांनी घेतली शंका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 12:19 PM2019-06-11T12:19:05+5:302019-06-11T12:20:16+5:30
राज्य शिक्षण मंडळाचा दहावीचा निकाल कमी लागल्यामुळे शहरातील कनिष्ठ महाविद्यालयातील जागा रिक्त राहण्याची शंका आहे. दरम्यान ११ वीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी केंद्रीय प्रवेश समितीने ठरविलेल्या केंद्रावर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्य शिक्षण मंडळाचा दहावीचा निकाल कमी लागल्यामुळे शहरातील कनिष्ठ महाविद्यालयातील जागा रिक्त राहण्याची शंका आहे. दरम्यान ११ वीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी केंद्रीय प्रवेश समितीने ठरविलेल्या केंद्रावर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. प्रवेश प्रक्रियेदरम्यान काही महाविद्यालयांना फायदा होण्यासाठी केंद्रात विद्यार्थ्यांच्या अर्जाच्या भाग २ मध्ये गडबड केली जाऊ शकत असल्याची शंका व्यक्त करण्यात आली आहे. शंका व्यक्त करणाऱ्या कॉलेजच्या व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व प्रशासकीय अधिकारी विभागीय शिक्षण उपसंचालकांना भेटण्याची तयारी करीत आहेत.
कार्यालयाने काही दिवसांपूर्वी ११ वीची प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी झोननुसार मुख्य व मार्गदर्शन केंद्र ठरविण्यात आले. विद्यार्थ्यांना संबंधित शाळेतून अप्लीकेशन किट घेण्यास सांगण्यात आले आहे; सोबतच केंद्रात जाऊन आधी अर्ज भरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यानंतर अर्ज २ विद्यार्थ्यांना भरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रश्न उपस्थित करणाºया कॉलेजच्या मते फॉर्म २ भरताना केंद्रात गडबड करण्यात येते. मागील वर्षीही अशीच गडबड झाली होती. फॉर्म २ मध्ये अनेक विद्यार्थ्यांच्या इच्छेशिवाय कॉलेजचे कोड देण्यात आले होते. यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या आवडीच्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळु शकला नाही. यावेळीही असेच होण्याची शक्यता आहे. यावेळी दहावीचा निकाल कमी लागला. त्यामुळे महाविद्यालयातील जागा रिक्त राहणार आहेत. यामुळे काही आॅनलाईन अर्जाच्या केंद्रासोबत साटेलोटे करून विद्यार्थ्यांच्या अर्जात गडबड करू शकत असल्याचे काही कॉलेजने म्हटले आहे. विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाने ११ वीच्या अर्जासाठी केंद्र ठरविताना कोणत्याच कॉलेजकडे विचारणा केली नसल्यामुळे कॉलेजने शंका व्यक्त केली आहे.