‘प्लेसमेंट’बाबत नागपूर विद्यापीठातील कॉलेजेस उदासीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 10:40 AM2018-10-25T10:40:02+5:302018-10-25T10:42:21+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील केवळ १८ टक्के संलग्नित महाविद्यालयांमध्येच ‘प्लेसमेंट सेल’ आहे. अशास्थितीत विद्यार्थ्यांना नेमके मार्गदर्शन कसे मिळेल, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
योगेश पांडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अलीकडच्या काळात बेरोजगारी ही एक मोठी समस्या बनली असून, पदवी-पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर विद्यार्थी दिशाहीन झालेले दिसतात. विद्यार्थ्यांना दिशा दाखविण्याची महाविद्यालयांचीही जबाबदारी आहे. मात्र विद्यार्थ्यांच्या ‘प्लेसमेंट’बाबत तसेच त्यांना मार्गदर्शन करण्याबाबत महाविद्यालयेच उदासीन आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील केवळ १८ टक्के संलग्नित महाविद्यालयांमध्येच ‘प्लेसमेंट सेल’ आहे. अशास्थितीत विद्यार्थ्यांना नेमके मार्गदर्शन कसे मिळेल, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
नागपूर विद्यापीठात सद्यस्थितीत ५८४ संलग्नित महाविद्यालये आहेत. यापैकी केवळ ११० महाविद्यालयांमध्ये ‘प्लेसमेंट सेल’ आहेत. यातील अनेक महाविद्यालयांमधील ‘सेल’ केवळ नावापुरतेच सुरू आहेत. या ‘प्लेसमेंट सेल’च्या माध्यमातून केवळ ११ हजार ५०० विद्यार्थ्यांना नेमके मार्गदर्शन मिळू शकते. शिवाय ‘प्लेसमेंट’साठी येणाऱ्या कंपन्यांशी लाखो विद्यार्थ्यांपैकी केवळ साडेअकरा हजार विद्यार्थीच जोडले जाऊ शकतात. मागील वर्षी विविध कंपन्यांनी घेतलेल्या ‘कॅम्पस’ मुलाखती तसेच महाविद्यालयांमधील ‘प्लेसमेंट सेल’च्या प्रयत्नातून ५ हजार २६९ विद्यार्थ्यांना महाविद्यालयातूनच थेट रोजगार मिळू शकला. यातही अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचीच संख्या जास्त होती.
विभागात कधी होणार ‘प्लेसमेंट सेल’?
नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांना रोजगार मिळावा, या उद्देशाने प्रत्येक पदव्युत्तर विभागात ‘प्लेसमेंट सेल’ची स्थापना करण्यात येणार असल्याची घोषणा प्रशासनाने केली होती. यासंदर्भात सर्व विभागांना सूचनादेखील देण्यात आल्या होत्या व तेथील प्राध्यापकांकडेच याचा अतिरिक्त कारभार देण्यात येणार असल्याचा दावा प्रशासनाने केला होता. मात्र याबाबत काहीच पुढाकार घेण्यात आला नाही. नागपूर विद्यापीठात काही वर्षांअगोदर ‘प्लेसमेंट सेल’ची स्थापना करण्यात आली होती. परंतु याचा फारसा प्रभाव दिसून आला नाही.
महाविद्यालयांकडून पुढाकारच नाही
साधारणत: अभियांत्रिकी,विज्ञान व व्यवस्थापन शाखेतील विद्यार्थ्यांचेच ‘कॅम्पस प्लेसमेंट’ होते, असा सर्वसाधारण समज आहे. मात्र कौशल्यविकासाच्या काळात पर्यटन, कृषी, विमा, कौशल्याधिष्ठित रोजगारक्षेत्र, ट्रान्सलेशन, वाणिज्य इत्यादी क्षेत्रांमध्ये अनेक संधी आहेत. मात्र या क्षेत्रातील उद्योग किंवा कंपन्यांना महाविद्यालयांपर्यंत आणण्यासाठी पुढाकारच घेतला जात नाही. ‘प्लेसमेंट सेल’च नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे.