कर्नल देशपांडे १९७१ च्या युद्धाचे शिलेदार...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 12:58 AM2018-04-21T00:58:00+5:302018-04-21T00:58:12+5:30

नाना पाटेकर यांच्या वर्ष १९९१ च्या ‘प्रहार’ चित्रपटापासून प्रेरणा घेऊन माजी कमांडो प्रशिक्षकाने लष्करी अकॅडमीची स्थापना केली. ‘प्रहार समाज जागृती’ संस्थेच्या स्थापनेसाठी त्यांनी एका चांगल्या हुद्याची नोकरी सोडली. प्रहार संघटनेच्या माध्यमातून तरुणांना देशभक्तीची शिकवण देत जागरुक नागरिक म्हणून घडविण्याचे कार्य ते सतत करीत राहिले. कर्नल सुनील देशपांडे असे त्या माजी कमांडो प्रशिक्षकाचे नाव. १९६५ आणि १९७१ च्या युद्धांसाठी विशिष्ट सेवा पदक (व्हीएसएम) मिळविणारे कर्नल देशपांडे शुक्रवारी काळाच्या पडद्याआड गेले.

Colonel Deshpande, a warrior of 1971 war ... | कर्नल देशपांडे १९७१ च्या युद्धाचे शिलेदार...

कर्नल देशपांडे १९७१ च्या युद्धाचे शिलेदार...

Next
ठळक मुद्देप्रहार संस्थेमधून ३००हून अधिक युवकांचा भारतीय लष्करात प्रवेश

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नाना पाटेकर यांच्या वर्ष १९९१ च्या ‘प्रहार’ चित्रपटापासून प्रेरणा घेऊन माजी कमांडो प्रशिक्षकाने लष्करी अकॅडमीची स्थापना केली. ‘प्रहार समाज जागृती’ संस्थेच्या स्थापनेसाठी त्यांनी एका चांगल्या हुद्याची नोकरी सोडली. प्रहार संघटनेच्या माध्यमातून तरुणांना देशभक्तीची शिकवण देत जागरुक नागरिक म्हणून घडविण्याचे कार्य ते सतत करीत राहिले. कर्नल सुनील देशपांडे असे त्या माजी कमांडो प्रशिक्षकाचे नाव. १९६५ आणि १९७१ च्या युद्धांसाठी विशिष्ट सेवा पदक (व्हीएसएम) मिळविणारे कर्नल देशपांडे शुक्रवारी काळाच्या पडद्याआड गेले.
१० एप्रिल १९४३ रोजी नागपुरात जन्मलेले कर्नल सुनील देशपांडे यांनी १९६४ मध्ये सेकंड मराठा रेजिमेंटच्या लाईट इन्फन्ट्रीमध्ये कमिशन्ड आॅफिसर म्हणून करिअरला सुरुवात केली. त्यांना भारत व पाकिस्तान यांच्यात झालेल्या १९६५ च्या युद्धात शौर्य गाजवण्याची संधी मिळाली. शत्रूच्या हल्ल्याला त्यांनी परतवून लावले होते. पाकिस्तानच्या युद्धानंतर कर्नल देशपांडे यांनी १९७१ च्या बांगलादेश मुक्ती युद्धातही सहभाग घेतला होता. पाकिस्तानच्या शक्करगढ येथील युद्धात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. पाकिस्तानचे अनेक रणगाडे त्यांच्या इन्फ न्ट्रीने उद्ध्वस्त केले होते. १९९३ मध्ये त्यांनी स्वेच्छानिवृत्तीची मागणी केली. त्यांचे शेवटचे पोस्टींग बेळगाव येथील कमांडो प्रशिक्षण केंद्रात होते. ‘प्रहार’ या चित्रपटातून कमांडो प्रशिक्षक म्हणून येण्यापूर्वी नाना पाटेकर यांना याच ठिकाणी कर्नल देशपांडे यांनी कमांडो प्रशिक्षण दिले. या चित्रपटातील शेवटच्या दृश्यात नाना पाटेकर लष्करी वेशात धावतोय आणि त्याच्या मागे असंख्य नागडी बालके धावताना दिसत आहेत. ‘कमॉन कमांडो’, अशी आरोळी देत नाना पुढे जातोय. राष्ट्र मजबुतीची परोपकारी वृत्ती ठेवून समाजात सैनिकांची मनोवृत्ती असावी, हा या चित्रपटातील संदेश घेऊन देशपांडे यांनी नोकरी सोडली आणि ९ जानेवारी १९९४ रोजी ‘प्रहार समाज जागृती’ संस्थेची स्थापना केली. मुलांसाठी २००२ मध्ये लष्करी प्रशिक्षण विद्यालयाची स्थापना केली. या दोन्ही संस्थेमधून सशक्त वर्तणूक, शिस्तबद्धता, धैर्य, देशभक्ती, दक्षता आणि मानवजातीची सेवा यासारख्या सैनिकांच्या वर्तणुकीला जागृत करण्याचे कार्य हाती घेतले. कर्नल देशपांडे यांनी उमरेडजवळ २.६६ एकर जागेत सैनिक प्रशिक्षण सुविधा उभारल्या. शिस्तबद्ध जीवनाचा अनुभव घेण्यासाठी या संस्थेमधून युवकांना दरवर्षी विविध लष्करी संस्थांमध्ये पाठविले जाते. आजवर ३०० हून अधिक युवकांनी भारतीय लष्करात प्रवेश घेतला.
कर्नल देशपांडे यांच्या या उल्लेखनीय कार्याला घेऊन त्यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. १९८२ मध्ये सैन्य दिनानिमित्त सैन्यदल प्रमुखांच्या हस्ते ‘कमांडेशन कार्ड’, १९८७ च्या प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपतींच्या हस्ते ‘विशिष्ट सेवा पदक’, १९९८ मध्ये बँकर्स स्पोर्टस कौन्सिलचा ‘स्वर्गीय जी. टी. परांडे अवॉर्ड’, २००० मध्ये महाराष्ट्र  शासनाचा ‘महाराष्ट्र  गौरव पुरस्कार’, २००१ मध्ये सावरकर स्मारक समिती नागपूरतर्फे ‘सावरकर गौरव’ पुरस्कार, २००२ मध्ये सावरकर स्मारक समिती मुंबईतर्फे ‘सावरकर गौरव’ पुरस्कार, २००३ मध्ये रोटरी क्लबच्यावतीने ‘व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड’, त्याच वर्षी मैत्री परिवारच्यावतीने सामाजिक कार्यासाठी पुरस्कार, २०१२ मध्ये ज्येष्ठ नागरिक मंडळ नागपूरतर्फे सामाजिक कार्यासाठी पुरस्कार देण्यात आले तर २०१४ मध्ये टाइम्स आॅफ इंडिया नागपूरतर्फे घेण्यात आलेल्या सर्वेक्षणात ‘हिरो आॅफ नागपूर’ म्हणूनही त्यांचा गौरव करण्यात आला.

 

Web Title: Colonel Deshpande, a warrior of 1971 war ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.