नागपुरात 'सखी आनंदोत्सवा'स रंगारंग सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2020 12:08 AM2020-02-15T00:08:05+5:302020-02-15T00:12:08+5:30
आंध्रा असोसिएशनच्या उत्तर अंबाझरी मार्गावरील अमृत भवनम्मध्ये शुक्रवारपासून तीन दिवसीय ‘सखी आनंदोत्सवा’स रंगारंग सुरुवात झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आंध्रा असोसिएशनच्या उत्तर अंबाझरी मार्गावरील अमृत भवनम्मध्ये शुक्रवारपासून तीन दिवसीय ‘सखी आनंदोत्सवा’स रंगारंग सुरुवात झाली आहे. कलावंतांशी संवाद साधण्यासोबतच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी सखी उत्साहित झाल्या. शिवाय, शॉपिंग फेस्टिव्हलमध्ये महाराष्ट्र आणि इतर राज्यांतील आकर्षक व उपयोगी वस्तूंनी सजलेल्या स्टॉल्सवर खरेदीचा आनंद त्यांनी घेतला. कार्यक्रमाचे उद्घाटन नगरसेविका डॉ. परिणय फुके, रिचाज युनिक क्लिनिकच्या संचालिका डॉ. रिचा जैन, कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या कुलपती नीलम मिश्रा, माजी सैनिक महिला संघटनच्या शीला टाले, पितांबरीचे प्रवीण यादव व विक्रम टी ग्रुपचे विक्री व्यवस्थापक कोमल उमरे यांच्या हस्ते झाले.
उद्घाटनानंतर लगेच दुपारी २ वाजता प्रसिद्ध अभिनेता किशोर भानुशाली (ज्युनिअर देवानंद) यांचा संगीतमय हौशी हंगामा सादर झाला. सखींनी या धमाल गेम शोचा मनमुराद आनंद लुटला. त्यानंतर व्हॅलेंटाईन फॅशन शोमध्ये दोन समूहांनी सहभाग घेतला. ‘अ’ समूहात २५ ते ४५ वयोगटातील तर ‘ब’ समूहात ४५ वर्षापुढील वयोगटातील स्पर्धक सहभागी झाले होते. या सगळ्यांनी लाल रंगातील पारंपरिक व वेस्टर्न वेशभूषा साकारून रॅम्पवॉक केले. मेंदी स्पर्धा, हेअर स्टाईल स्पर्धा, फन झोन व सेल्फी पॉईंटही महिलांमध्ये आकर्षणाचे केंद्र ठरले. स्पर्धेतील विजेत्यांना रविवारी १६ फेब्रुवारी रोजी पुरस्कृत केले जाईल. या महोत्सवात दररोज लकी ड्रॉ व पितांबरीकडून सखींना भेटवस्तू दिल्या जात आहेत. कार्यक्रमात सर्वांनाच प्रवेश आहे. सखी मंच सदस्य, लोकमत वाचक कुटुंबासह महोत्सवात आमंत्रित आहेत. शिवाय, कार्यक्रम स्थळी सखी मंच सदस्यता २०२०ची नोंदणीही केली जात आहे.