हाहाकार उडविणाऱ्या ‘काेराेना’चा इतिहास आता प्रत्यक्ष येऊन बघा; रमन विज्ञान केंद्रात विशेष गॅलरी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2023 12:05 PM2023-08-02T12:05:20+5:302023-08-02T12:08:17+5:30
प्रसार, लस निर्मिती व सर्वच
नागपूर : महामारी काय असते, त्याचे किती गंभीर परिणाम हाेतात, याचा प्रत्यक्ष अनुभव वर्तमान पिढीने काेराेना महामारीच्या रूपात घेतला आहे. काेराेना आता इतिहासजमा झाला आहे; पण, ताे इतिहासच आहे. हा इतिहास आता प्रत्यक्ष पाहता, निरीक्षण करता व अभ्यासता येणार आहे. रमन विज्ञान केंद्र व तारामंडळामध्ये ‘काेराेना’चा इत्थंभूत काळ दर्शविणारी ‘लस आशेचा किरण’ ही विशेष गॅलरी तयार हाेत असून, लवकरच ती सुरू हाेणार आहे.
सहा टप्प्यांत असलेल्या या गॅलरीत अनेक प्रतिकृतींचे दर्शन घडेल. यामध्ये गॅलरीत प्रवेश करताच काेविड-१९ विषाणू व महामारीच्या काळातील परिस्थिती दर्शविणारी प्रतिकृती लक्ष वेधून घेईल. पुढे विषाणू म्हणजे काय? काेराेना विषाणू म्हणजे काय? त्याचा उगम कुठून झाला? शरीरामध्ये ताे कसे काम करताे आणि एका शरीरातून दुसऱ्यात ताे कसा पसरताे, याची माहिती मिळेल. यानंतर काेराेनाचा विषाणू जगभर कसा पसरत गेला, त्याने कसा हाहाकार उडवून दिला, माणसे पटापट कशी मेली याचा इतिहास आपल्या दृष्टिपथास पडेल. यात भारतीय परिस्थितीचेही दर्शन घडेल.
यापुढे लस म्हणजे काय? आतापर्यंत काेणकाेणत्या आजारांच्या लस काढण्यात आल्या? याचीही माहिती मिळेल. यानंतर काेविड-१९ विषाणूवर भारतीय लस काेव्हॅक्सिन व काेव्हिशिल्ड निर्मितीची प्रक्रिया, भारतीय गरजेनुसार माेठ्या प्रमाणात निर्मिती, बायाेरिॲक्टरचा उपयाेग, लसीचे देशभरात वितरण कसे करण्यात आले? सर्वांत आधी लस कुणी घेतली? या सर्व गाेष्टींची माहिती आपल्याला मिळते. लस निर्मितीत महत्त्वपूर्ण याेगदान देणाऱ्या डाॅ. प्रज्ञा यादव यांनी परिधान केलेले पीपीई किट येथे प्रदर्शनास ठेवण्यात आले आहेत.
एकूणच काेराेना महामारीचे वैज्ञानिक विश्लेषण करण्याचा प्रयत्न या गॅलरीतून करण्यात आला असून, विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी आणि पर्यटकांना हा काळ जाणून घेण्यासाठी माेठी मदत हाेणार आहे. ही गॅलरी ५ ऑगस्टपर्यंत सुरू करण्याची शक्यता येथील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.