दोन तासाच्या आत क्वारंटाईन होण्यासाठी या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2020 09:15 PM2020-05-16T21:15:56+5:302020-05-16T21:19:26+5:30

सतरंजीपुरा येथील ९० टक्के संक्रमित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. नवीन रुग्ण सापडण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. त्यानंतरही शनिवारी पुन्हा सतरंजीपुरा आणि आसपासच्या परिसरातील ८५ कुटुंबाला क्वारंटाईन करण्यासाठी प्रशासनाने हालचाली केल्या.

Come to be quarantined within two hours! | दोन तासाच्या आत क्वारंटाईन होण्यासाठी या!

दोन तासाच्या आत क्वारंटाईन होण्यासाठी या!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सतरंजीपुरा येथील ९० टक्के संक्रमित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. नवीन रुग्ण सापडण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. त्यानंतरही शनिवारी पुन्हा सतरंजीपुरा आणि आसपासच्या परिसरातील ८५ कुटुंबाला क्वारंटाईन करण्यासाठी प्रशासनाने हालचाली केल्या. यासाठी महापालिकेचे अधिकारी, पोलीस, आरोग्य अधिकारी तेथे पोहोचले. अर्ध्या डझन बसही सकाळी ११ वाजताच्या सुमारास तेथे दाखल झाल्या. ‘दोन तासाचा वेळ आहे, ज्यांना स्वेच्छेने क्वारंटाईन व्हायचे आहे, त्यांनी कुटुंबातील सदस्यांसह साहित्य घेऊन बसमध्ये बसावे’ असे प्रशासनाने आवाहन केले. मात्र त्यानंतर एकही नागरिक स्वेच्छेने पुढे आला नाही. त्यामुळे प्रशासनाला आल्या पावली परतावे लागले.
सतरंजीपुरा येथील नागरिकांनी ‘लोकमत’ला सांगितले की, प्रशासनातर्फे कोणतेही लिखित पत्र वा नोटीस दिलेली नव्हती. केवळ काही तासाच्या आधी येऊन क्वारंटाईन होण्यासाठी सांगणे कितपत योग्य आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. क्वारंटाईन करावयाचे असल्यास जबरदस्तीने उचलून घेऊन जावे, आम्ही स्वत:हून येणार नाही अशी ताठर भूमिका नागरिकांनी घेतली. सतरंजीपुऱ्यातील तेलंगीपुरा आणि आदिवासी वसतिगृहाच्या आसपास रुग्ण आढळून आला नाही आणि संक्रमण पसरण्याचीही काही शक्यता नाही, असे नागरिकांनी सांगितले.
प्राप्त माहितीनुसार, झोनचे सहायक आयुक्त विजय हुमणे, आरोग्य अधिकारी डॉ. मीनाक्षी माने यांच्यासह अधिकारी आणि स्थानिक नगरसेवक यावेळी उपस्थित होते. सतरंजीपुरा येथे लाऊडस्पीकरवरून वारंवार आवाहन केले जात होते. मात्र सायंकाळपर्यंत कुणीही क्वारंटाईनसाठी तयार झाले नसल्याची माहिती आहे. नगरसेवक नितीन साठवणे यांनी सांगितले की, ‘प्रशासनातर्फे नागरिकांना स्वेच्छेने क्वारंटाईन होण्याचे आवाहन केले होते. लोकप्रतिनिधी म्हणून मी स्वत:ही लोकांना समजावले. मात्र सायंकाळपर्यंत कुणीही तयार झाला नाही.’

पाणी, विद्युत पुरवठा बंद करण्याची धमकी
सूत्रानुसार, क्वारंटाईन करण्यासाठी पोहोचलेल्या अधिकाऱ्यांनी वीज आणि पाणीपुरवठा बंद करण्याची तेथील नागरिकांना धमकी दिली. परंतु त्यानंतरही नागरिकांमध्ये काहीही फरक पडला नाही. ‘जे करायचे ते जबरदस्तीने करा, स्वेच्छेने आम्ही क्वारंटाईन होणार नाही. यापूर्वीही अनेक नागरिक क्वारंटाईन झाले. त्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे’ असे नागरिकांनी सांगितले.

Web Title: Come to be quarantined within two hours!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.