मुद्रा लोनसाठी येता येता झाले जोडीदार
By Admin | Published: February 14, 2017 02:05 AM2017-02-14T02:05:41+5:302017-02-14T02:05:41+5:30
व्हॅलेंटाईन डेचा दिवस येताच विवाहित असो वा अविवाहित युवकांच्या मनात आपल्या प्रेयसी-प्रियकराबद्दल प्रेमाची भावना निर्माण होते.
त्यांच्यासाठी व्हॅलेंटाईन डे ठरलाय अभूतपूर्व : बँक कर्मचाऱ्यांनी लावून दिले लग्न
राघवेंद्र तिवारी नागपूर
व्हॅलेंटाईन डेचा दिवस येताच विवाहित असो वा अविवाहित युवकांच्या मनात आपल्या प्रेयसी-प्रियकराबद्दल प्रेमाची भावना निर्माण होते. असाच पहिला व्हॅलेंटाईन डे नीलेश आणि अर्चनासाठी आला असून ते नुकतेच लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. परंतु सर्वसामान्य जोडप्यांपेक्षा त्यांची कहाणी थोडी वेगळी आहे.
अर्चनासाठी या व्हॅलेंटाईन डेला ‘सपना भी आप ही है, हकीकत भी आप है....बस आप आप ही मुझ मे समाए है’ हे गीत योग्य ठरते. कारण अर्चना पूर्णपणे नेत्रहीन आहे. तिचे स्वप्न प्रत्यक्षात तेव्हा साकारले जेव्हा तिच्या जीवनात तिच्या वयाच्या नीलेशची साथ तिला मिळाली. नीलेश भटसाठी हा व्हॅलेंटाईन डे अभूतपूर्व आणि सुखाचा आहे. त्यांच्यासाठी ‘आँखो का रंग ढुंढा हे हीरे तराशकर...दिल मे सजाएंगे ये रंग यू ही उम्र भर...मुश्किल से जिंदगी के रंग हाथ आये है’ हे गीत तंतोतंत खरे ठरते. नीलेशही केवळ २५ टक्केच हे जग पाहू शकतो. मूळचा तुमसर येथील रहिवासी असलेला नीलेश काही महिन्यांपूर्वी एका अशासकीय संस्थेत नेत्रहीन विद्यार्थ्यांना शिकवीत होता. कसेबसे आपले जीवन जगत असताना विवाह करण्याचे मनातही नव्हते. बिनाकी मंगळवारी येथील रहिवासी अर्चना पिंपळघरेही याच शाळेत येत होती. दोघांनाही स्वयंरोजगारासाठी कर्जाची गरज होती. त्यामुळे दोघांनीही बँक आॅफ इंडियाच्या शंकरनगर शाखेत अर्ज केला. दरम्यान दोघांची ओळख झाली. नीलेशने अर्चनाला पसंत केले. परंतु अर्चना नीलेशला एका आवाजाच्या रूपातच ओळखत होती. कर्जासाठी बँकेत येतायेताच दोघांची ओळख प्रेमात बदलली. परंतु दोघांजवळ विवाहासाठी काहीच साधन नव्हते. बँकेच्या कर्मचाऱ्यांना ही बाब समजली. बँकेचे प्रादेशिक व्यवस्थापक चंद्रकांत पोपरे यांच्या निर्देशावरून क्रेडिट मॅनेजर माधव लिमजे यांनी त्वरित कर्ज मंजूर केले; सोबतच बँकेच्या कर्मचाऱ्यांनी दोघांचे गायत्री शक्तिपीठात लग्न लावून दिले. बँकेतर्फे त्यांना घरात गरजेचे असलेले साहित्यही देण्यात आले. सध्या दोघेही मानेवाडा-बेसा रोडवर सुखी जीवन जगत आहेत. बँक स्टाफ युनियनचे अध्यक्ष सत्यशिव रेवतकर यांनी सांगितले की, नीलेश भटने कर्ज घेऊन दुधाचा व्यवसाय सुरू केला. हा व्यवसाय ते इमानदारीने करून कर्जाची परतफेड करीत आहेत.