विज्ञान-तंत्रज्ञानाच्या साथीने देशाच्या विकासासाठी पुढे या; माफसुच्या १० व्या दीक्षांत समारंभात सुनील केदार यांचे प्रज्ञावंतांना आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2021 06:59 PM2021-11-10T18:59:18+5:302021-11-10T18:59:52+5:30
Nagpur News देशाची प्रगती साधण्यासाठी पुढे या, असे आवाहन महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे प्रतिकुलपती तथा पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी केले.
नागपूर : पशु-दुग्धविकास तंत्रज्ञानातूनच देशाची अर्थव्यवस्था बळकट होण्याची संधी आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत या विभागाचा ६० टक्के वाटा आहे. या क्षेत्रातील वाटा विज्ञान तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विस्तारल्या आहेत. त्यामुळे त्याच्या साथीने देशाची प्रगती साधण्यासाठी पुढे या, असे आवाहन महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे प्रतिकुलपती तथा पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी केले.
महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचा १०वा दीक्षांत समारंभ बुधवारी स्व. वसंतराव देशपांडे स्मृती सभागृहात झाला. व्यासपीठावर विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. आशिष पातुरकर, कुलसचिव सचिन कलंत्रे, पशुवैद्यक विद्या शाखेचे अधिष्ठाता तथा शिक्षण संचालक डॉ. शिरीष उपाध्ये, दुग्ध-तंत्रज्ञान विद्या शाखेचे अधिष्ठाता डाॅ. प्रशांत वासनिक यांच्यासह कार्यकारी परिषदेचे सर्व सदस्य उपस्थित होते. वैज्ञानिक व औद्याेगिक संशोधन परिषद नवी दिल्लीचे महासंचालक डॉ. शेखर मांडे यांनीही समारंभाला पूर्णवेळ ऑनलाईन उपस्थिती लावली.
सर्वाधिक सुवर्णपदके मिळविणाऱ्या रितू पांघल आणि जासना नांबिर या विद्यार्थिनींचा उल्लेख करून केदार म्हणाले, प्रेरणा घ्यावी असे या विद्यार्थिनींचे यश आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये पशुपालनाचा मोठा आधार आहे. पदवी मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मुलींचा समावेश अधिक आहे. अर्थव्यवस्था सांभाळण्यात महिलांचा वाटा मोठा असतो. यामुळे हा समारंभ देशाच्या दृष्टीने आशादायी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
‘गाव बनाओ-देश बनाओ’ असा संदेश महात्मा गांधींनी दिला होता. त्यांच्या स्वप्नातील सक्षमता आणण्यासाठी पशुसंवर्धन, दुग्धविकासात अधिक संशोधनात्मक प्रगती साधा, असे आवाहन त्यांनी पदवीधरांना केले.
दृक-श्राव्य माध्यम प्रणालीतून साधलेल्या संवादात डॉ. शेखर मांडे यांनी महात्मा गांधींनी दिलेल्या सात मूलमंत्रांचा वापर आयुष्यात करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, आयुष्यातील आव्हाने पार करण्याची संधी विज्ञान-तंत्र शिक्षणातून मिळाली आहे. या ज्ञानाचा समाजहितासाठी वापर करा. कोरोनाने माणसांना जगण्याचा धडा शिकविला आहे. पशुवैद्यक-दुग्धव्यवस्थापन शास्त्राचा वापर करून माणसांचे आयुष्य अधिक सुखकर करण्यासाठी आता पुढे निघा.
कुलगुरू डॉ. पातूरकर यांनी प्रास्ताविकातून विद्यापीठाच्या कार्याचा आढावा सादर केला. विद्यापीठाने आज पदवीधरांना पदव्या हातात देऊन आयुष्याच्या नव्या प्रवासाच्या वाटा मोकळ्या केल्या आहेत. त्यांनी विज्ञानापासून वैज्ञानिक व उद्योजकांपर्यंतचे सर्व क्षेत्र यशस्वी करावे, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.
...
रितू पांघल आणि जासना नांबिरची छाप
या दीक्षांत समारंभावर नागपूर पशुवैद्यक महाविद्यालयातील रितू पांघल आणि मुंबई पशुवैद्यक महाविद्यालयातील विद्यार्थिनी जासना नांबिरची छाप जाणवली. पांघल यांनी ७ सुवर्णपदके व ४ रजतपदके मिळविली, तर जासना यांनी ५ सुवर्णपदके व एक रोख पारितोषिक मिळविले. या समारंभात १,२५३ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. ३९ आचार्य, त्यात ९३९ स्नातक, २७५ स्नातकोत्तर विद्यार्थ्यांचा समावेश होता. विशिष्ट गुणवत्तेसाठी ५९ सुवर्णपदके, १५ रजतपदके जाहीर झाली. मात्र, समारंभाला आचार्य पदवीप्राप्त ३५ आणि पदकप्राप्त ४३ विद्यार्थी उपस्थित होते.
...