चला, उपराजधानीला सुंदर करू या!

By admin | Published: May 23, 2017 02:10 AM2017-05-23T02:10:41+5:302017-05-23T02:10:41+5:30

आसपास दिसणारा कचरा व अस्वच्छता पाहिल्यानंतर जबाबदारी झटकून प्रशासनाच्या नावाने बोटे मोडणाऱ्यांची शहरामध्ये कमतरता नाही.

Come on, let's be good manners! | चला, उपराजधानीला सुंदर करू या!

चला, उपराजधानीला सुंदर करू या!

Next

आय-क्लीन नागपूरचा पायंडा : आतापर्यंत ८६ भिंतींचे सौंदर्यीकरण
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आसपास दिसणारा कचरा व अस्वच्छता पाहिल्यानंतर जबाबदारी झटकून प्रशासनाच्या नावाने बोटे मोडणाऱ्यांची शहरामध्ये कमतरता नाही. मात्र आपल्या शहरासाठी आपणही जबाबदारी घेऊन काही करू शकतो, असा विचार फार थोड्यांमध्ये असतो. अशाच काही समविचारी लोकांनी शहराच्या स्वच्छतेची एक मोहीमच सुरू केली आहे. ‘आय-क्लीन नागपूर’च्या माध्यमातून स्वच्छतेचे ध्येय घेतलेल्या या शहरातील ८६ सार्वजनिक भिंतींची रंगरंगोटी व सौंदर्यीकरण केले आहे.
आय-क्लीन नागपूर ही संस्था किंवा अशासकीय संघटना (एनजीओ) नाही. केवळ नागपूरच्या स्वच्छतेचे ध्येय घेतलेल्या समविचारी लोकांचा ग्रुप आहे. यामध्ये उद्योजकांसह डॉक्टर्स, अभियंता, विद्यार्थी, गृहिणी आणि वेगवेगळ्या क्षेत्रात नोकरी करणारे या ग्रुपचे सदस्य आहेत. यातील सदस्य असलेले संदीप अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार ९ नोव्हेंबर २०१४ पासून वंदना मुजूमदार यांच्या पुढाकारातून काही गृहिणींनी हा स्वच्छ शहराचा सामाजिक उपक्रम सुरू केला. आठवड्यातील सहा दिवस आपल्या क्षेत्रात काम करणारे ग्रुपचे व्हॉलेंटीयर रविवारी सुटीच्या दिवशी एकत्रित येतात व ठरलेल्या ठिकाणी स्वच्छता व सुशोभीकरणाचे अभियान राबवितात.
आसपासच्या परिसराच्या स्वच्छतेसह तेथील सार्वजनिक भिंतींना आकर्षक रंगरंगोटी करून सौंदर्य देणे हा या उपक्रमाचा मुख्य भाग आहे. महत्त्वाचे म्हणजे गेल्या अडीच वर्षात या ग्रुपच्या सदस्यांनी शहरातील तब्बल ८६ भिंतींना सुशोभित करून बोलके रूप दिले आहे. असाच एक उपक्रम २०१३ पासून भोपाळमध्ये राबविल्या जात आहे. या उपक्रमाची प्रेरणा घेऊन ही मोहीम नागपुरातही सुरू केली गेली. शहरातील अस्वच्छ व घाणेरडे असे ठिकाण निश्चित करायचे. स्वच्छतेच्या कामासाठी महापालिका किंवा जबाबदार शासकीय संस्थेकडून परवानगी घ्यायची दर रविवारी त्या ठिकाणच्या सौंदर्यीकरणाचा उपक्रम राबवायचा. रविवारी गोळा झालेले सदस्य आधी ठरलेल्या परिसरामधला कचरा साफ करतात व ठरलेली भिंतीही साफ करतात. त्यानंतर विशेषत: वारली कलेद्वारे त्या भिंतीला सुबक असे रंगविले जाते. या व्हॉलेंटीयरमध्ये काही चित्रकारांचा सहभाग झाल्याचे संदीप अग्रवाल यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. आय-क्लीनच्या ३० ते ३५ नियमित सदस्यांसह मौखिक प्रचार, फेसबुक व अन्य सोशल साईट्स च्या माध्यमातून १२० पेक्षा जास्त नवे व्हॉलेंटीयर उपक्रमाशी जुळल्याचे अग्रवाल यांनी सांगितले. महापालिका प्रशासन, कर्मचारी व परिसरातील नागरिकांकडूनही चांगला प्रतिसाद या उपक्रमाला मिळत आहे.

आय-क्लीन नागपूरची नवी दिशा
‘आय-क्लीन’च्या माध्यमातून आतापर्यंत रेल्वे स्टेशन परिसर, एमपी बसस्थानक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, एअर इंडिया चौक सिव्हिल लाईन्स, रामनगर चौक, इतवारी रेल्वे स्टेशन, मातृ सेवा संघाची भिंत, महाराजबाग रोड, सीताबर्डी पोलीस स्टेशन, कॉटन मार्केट भागाकडील रेल्वे स्टेशनची भिंत असे अनेक परिसर व भिंती या संघटनेने सुशोभित केल्या आहेत. संघटनेच्या माध्यमातून डॉ. प्रकाश आमटे यांच्या हेमलकसा येथील लोक बिरादरी प्रकल्पाच्या मैदानाचे सौंदर्यीकरण आय-क्लीनच्या सदस्यांनी केले आहे. याशिवाय शाळा, महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा व जनजागृतीचा उपक्रमही संघटनेकडून राबविला जात आहे. अनेक मान्यवरांसह नुकतीच महापौर नंदा जिचकार यांनी आय-क्लीनच्या उपक्रमाला स्पॉट भेट देऊन कार्याची प्रशंसा केली. हे अभियान असेच अनवरत सुरू राहणार असल्याचा विश्वास संदीप अग्रवाल यांनी दिला.

गेल्या अडीच वर्षांत या उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळत असून, स्वच्छतेचा ध्येय बाळगलेले सदस्य सतत या मोहिमेशी जुळत आहेत. स्वच्छता ही चांगल्या आरोग्याची गरज आहे व ते प्रत्येकाच्या जगण्याचा भाग झाला पाहिजे. आपल्या घरासोबत आसपासचा परिसरही स्वच्छ राहावा ही जाणीव असणे गरजेचे आहे. वारली पेंटिंगद्वारे भिंतीचे सौंदर्यीकरण मनाला समाधान देणारे आहे.
- संदीप अग्रवाल, सदस्य आय-क्लीन नागपूर

Web Title: Come on, let's be good manners!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.