कार्यालयात आले की चौकात फिरायला? तुकाराम मुंढे यांचा सवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2020 11:08 AM2020-02-20T11:08:46+5:302020-02-20T11:09:08+5:30
शाळेतील विद्यार्थ्यांसारखा ड्रेस कोड अनिवार्य करावा, असे मला योग्य वाटत नाही. अशा स्वरूपात आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बुधवारी कर्मचारी व अधिकाऱ्यांचा क्लास घेतला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील ३० लाख लोकांची जबाबदारी महापालिकेतील कर्मचारी-अधिकाऱ्यांवर आहे. निष्ठापूर्वक सर्वांना काम करावे लागेल. जबाबदारीचे भान ठेवण्यासोबतच कार्यालयाचा एक डेकोरम असतो. त्याचे पालन झाले पाहिजे. टी शर्ट व जीन्स पॅन्ट घालून आपण कोणत्या चौकात फिरायला आलेलो नाही, हे कार्यालय आहे. शर्ट व पॅन्ट नीटनेटका घालून या.
शाळेतील विद्यार्थ्यांसारखा ड्रेस कोड अनिवार्य करावा, असे मला योग्य वाटत नाही. अशा स्वरूपात आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बुधवारी कर्मचारी व अधिकाऱ्यांचा क्लास घेतला. महापालिका मुख्यालयात आयोजित शिवजयंती कार्यक्रमात हा प्रकार घडला. जयंती वा पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला महापालिकेतील मोजके च अधिकारी मुख्यालयात येतात. माल्यार्पण करून अभिवादन करून निघून जातात.
परंतु बुधवारी सुमारे ४०० कर्मचारी व अधिकारी मुख्यालयात पोहचले. उपस्थितांना आयुक्तांनी मार्गदर्शन केले. यावेळी काही कर्मचारी जीन्स पॅन्ट घालून आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांना आयुक्तांनी शिस्तीचे डोज दिले. महापालिका एक कुटुंब आहे. येथे कार्यालयीन शिस्त असते. निटनेटके कपडे घालणे अनिवार्य आहे. दररोज दाढी करा, जीन्स पॅन्ट-टी शर्ट माझ्याकडेही आहे. पण ते कार्यालयात घालून येण्याची गरज नाही. कार्यालयीन निटनेटके कपडे घालून या. यातून जनमानसात चांगली प्रतिमा निर्माण होईल. अशीच तत्परता नागरिकांची कामे करताताही ठेवा. अधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यासारखे राहिले पाहिजे. नियम व कायद्याचे ज्ञान असायला हवे. काम करताना अनवधानाने चुकी झाली तर ती सुधारण्याची संधी दिली जाईल. परंतु हेतुपुरस्पर करण्यात आलेल्या चुकीला क्षमा करणार नाही. वेळेवर कार्यालयात या, आपली ड्यूटी करा, कार्यालय स्वच्छ ठेवा. जी जबाबदारी सोपविली आहे ती प्रामाणिकपणे पार पाडा. दुप्पट क्षमतेने काम करून महापालिकेला पुढे आणा, असे आवाहनही मुंढे यांनी केले.
अन् जप्त झाला केला मोबाईल
शिवजयंती कार्यक्रमाला सुरुवात होण्यापूर्वी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सर्वांना मोबाईल स्विच ऑफ वा सायलेंट मोडवर ठेवण्यास सांगितले. तरीही या दरम्यान एका कर्मचाऱ्याचा मोबाईल वाजला. आयुक्तांनी संबंधित कर्मचाऱ्याचा मोबाईल लगेच जप्त केला. कर्मचाऱ्याला सीमकार्ड परत के ले. पण मोबाईल परत केला नाही. यातून त्यांनी दिलेल्या आदेशाचे पालन झाले पाहिजे असे संकेत दिले.
आमसभेत पुन्हा सत्तापक्ष-आयुक्त आमने-सामने
महापालिकेची सर्वसाधरण सभा आज गुरुवारी महाल येथील टाऊ न हॉल येथे आयोजित करण्यात आली आहे. यात पुन्हा सत्तापक्ष व आयुक्त आमने-सामने येणार आहेत. मंगळवारी सत्तापक्षाच्या नगरसेवकांनी कार्यादेश झालेली कामे थांबविल्याच्या मुद्यावरून आयुक्तांना घेरण्याचा प्रयत्न केला. याचा विचार करता विविध मुद्यावरून सभागृहात आयुक्तांना कोंडीत पकडण्याची संधी सत्तापक्षाचे नगरसेवक सोडणार नाहीत. तर आयुक्तांनी आपल्या अधिकाऱ्यांना तयारीनिशी उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत. आयुक्तही प्रशासनाची बाजू भक्कमपणे मांडण्याच्या तयारीत आहेत.