हास्य अभिनेता ज्युनियर महेमूदचे होते नागपूरशी नाते; रेल्वे स्थानकावरच जमविली होती गप्पांची मैफल; मित्राने जागविल्या आठवणी
By नरेश डोंगरे | Published: December 9, 2023 10:41 PM2023-12-09T22:41:49+5:302023-12-09T22:42:38+5:30
शुक्रवारी ८ डिसेंबरला ज्युनियर महेमूद यांचे निधन झाल्याने त्यांच्या लाखो चाहत्यांना धक्का बसला आहे. या पार्श्वभूमीवर, त्यांच्या एका मित्राने आज त्यांच्या आठवणी जिवंत केल्या.
नागपूर : नन्हा सुपरस्टार म्हणून भारतीय चित्रपट सृष्टीत नाव कमविणारे आणि हिंदी, मराठीसह विविध भाषांतील अडीचशेवर चित्रपटात भूमीका वठविणारे महान हास्य अभिनेता नईम सय्यद उर्फ ज्युनियर महेमूद यांचे नागपूरशीही नाते होते. शुक्रवारी ८ डिसेंबरला ज्युनियर महेमूद यांचे निधन झाल्याने त्यांच्या लाखो चाहत्यांना धक्का बसला आहे. या पार्श्वभूमीवर, त्यांच्या एका मित्राने आज त्यांच्या आठवणी जिवंत केल्या.
मोहब्बत जिंदगी है... या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर आलेल्या ज्युनियर महेमूद यांचे वडिल रेल्वेत ड्रायव्हर होते. साधन सुविधा असल्या तरी त्यावेळी एवढी सधनता नसल्याने ज्युनियर महेमूद बरेचदा शुटींगच्या निमित्ताने रेल्वेनेच सफर करायचे. भारतीय यात्री केंद्राचे सचिव बसंतकुमार शुक्ला हे त्यांचे मित्र. १९८५ ला असेच एकदा ते दुसऱ्या एका शहरातून शुटिंग आटोपून नागपुरात आले. त्यांना येथून मुंबईला जायचे होते. मात्र, त्यांच्या गाडीला वेळ असल्याने शुक्ला यांनी त्यांची रेल्वे स्थानकावरच खातिरदारी केली आणि नंतर येथेच गप्पाची मैफल रंगली. यावेळी अगदी बिनधास्तपणे ज्युनियर मेहमूद यांनी रेल्वे लोको पायलटचा मुलगा ते नन्हा सुपरस्टार म्हणून मिळालेल्या उपाधीपर्यंतचा आपला जीवन प्रवास या मैफलीत मित्रांसमोर उलगडला.
तत्कालिन महान हास्य अभिनेता महेमूद यांची चित्रपट सृष्टीच अन् सिने रसिकांवर प्रचंड छाप होती. त्यांचे करोडो चाहते होते. त्यातीलच एक नईम सय्यदही होते. बालपणापासूनच चित्रपटाची आवड असलेले नईम सय्यद चित्रपट बघून आल्यानंतर महेमूद यांची नक्कल (मिमिक्री) करून कुटुंबीयांना आणि शेजाऱ्यांना हसवत होते. त्यावेळी त्यांच्या मिमिक्रीला घरच्यांनी प्रोत्साहन दिल्याने त्यांना सार्वजनिक कार्यक्रमात स्थान मिळू लागले आणि यातूनच त्यांना रुपेरी पडद्यावरही जागा मिळाली. हास्य अभिनेता यांच्याशी नईम सय्यदची भेट झाल्यानंतर त्यांची मिमिक्री पाहून महेमूद कमालीचे प्रभावित झाले. आपण तुम्हाला गुरू मानत असल्याचे सांगताच त्यांनी आपल्याला त्यावेळी ज्युनियर महेमूद म्हणून गुरुदक्षिणा आणि आशीर्वाद दिल्याचे नईम सैय्यद यांनी त्या मैफलीत सांगितले होते.
लोकप्रिय मात्र, सरळसाधे अन् अघळपघळ !
त्यावेळी ते खुप लोकप्रिय होते. त्यांना बघण्यासाठी त्यावेळेलाही चाहत्यांची जागोजागी गर्दी व्हायची मात्र ते सरळसाधे अन् अघळपघळ होते. ते कसलाही बडेजावपणा करीत नव्हते. ज्युनियर महेमूद यांना त्यावेळी चहाचा भारी शाैक होता. गरम, कडक चहा त्यांना खूप आवडायची. येथेही त्यांनी 'गरम कडक चाय पिलाओ' अशी हक्काची मागणी नोंदवली होती. नागपूर स्थानकावरच्या या मैफलीनंतर त्यांनी आपल्या चाहत्यांसोबत फोटोही काढून घेतले होते, असे आज बसंत शुक्ला यांनी 'लोकमत'ला सांगितले.