कामठीत डान्स बार
By admin | Published: July 7, 2017 01:52 AM2017-07-07T01:52:14+5:302017-07-07T01:52:14+5:30
खैरी कामठीतील वेलकम बार अॅन्ड रेस्टॉरंटमध्ये विशेष शाखेचे उपायुक्त नीलेश भरणे यांनी छापा घातला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : खैरी कामठीतील वेलकम बार अॅन्ड रेस्टॉरंटमध्ये विशेष शाखेचे उपायुक्त नीलेश भरणे यांनी छापा घातला. यावेळी त्यांना बारमध्ये दारू पिताना ग्राहक सापडले तर समोर आॅर्केस्ट्राच्या धूनवर चार तरुणी थिरकत होत्या. उपायुक्त भरणे यांनी या सर्वांना ताब्यात घेतले. विशेष म्हणजे, उपायुक्तांच्या या कारवाईनंतर तासा-दोन तासातच त्या सर्वांना जुन्या कामठी पोलीस ठाण्यातून मोकळे करण्यात आले. यामुळे ही कारवाई वादग्रस्त ठरली असून, त्याचे परिणाम येत्या काही तासात संबंधित पोलिसांवर होण्याचे संकेत मिळाले आहे.
विशेष शाखेचे उपायुक्त नीलेश भरणे यांचा बुधवारी रात्री नाईट राऊंड होता. त्यांना मिळालेल्या गोपनीय सूचनेनुसार, त्यांनी पहाटे २ च्या सुमारास आपल्या सहकाऱ्यांसह वेलकम बार मध्ये छापा घातला. उपायुक्त भरणे यांनी सांगितल्याप्रमाणे त्यावेळी तेथे आॅर्केस्ट्रा सुरू होता. चार तरुणी नृत्य करीत होत्या आणि समोर बसलेले ८ ते १० ग्राहक दारूच्या नशेत झिंगत होते.
हॉटेलचे कर्मचारी त्यांना सेवा देत होते. दरम्यान, उपायुक्तांनी छापा टाकल्याचे कळताच जुनी कामठीचे पोलीस धावतपळत तेथे पोहचले. उपायुक्तांनी त्यांची खरडपट्टी काढून त्यांना या गैरप्रकाराबाबत जाब विचारला. त्यानंतर त्या तरुणींसह सर्वांनाच ताब्यात घेण्यात आले. त्यांना पोलिसांच्या वाहनात बसवून पोलीस ठाण्यात पाठविण्यात आले. त्यानंतर मात्र या कारवाईचा नूरच पालटला.
ठाणेदार पोलीस ठाण्यात नसल्यामुळे की काय, येथे त्या सर्वांचे बयान घेऊन औपचारिकता पार पाडत सर्वांना मोकळे करण्यात आले.
कामठी पोलीस अनभिज्ञ
४विशेष म्हणजे, थेट उपायुक्तांनी कारवाई करूनही जुनी कामठी पोलीस या संबंधाने माहिती देण्यास सकाळपासून टाळाटाळ करीत होते. माहिती कक्षाला त्यांनी रात्री केवळ चलान कारवाईबाबत सांगितले. त्यामुळे उलटसुलट चर्चेला उधाण आले असून, हे प्रकरण पोलिसांच्या अंगलट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.